टॅक्सीडर्मी जाणार नाशिकला : भारतीय लष्कराच्या संग्रहालयातील तोफखाना केंद्रात दाखल
स्नेहा मोरे ल्ल मुंबई
मृत प्राण्याच्या त्वचेवर प्रक्रिया करून त्यात स्टफिंग करून हुबेहुब आकारात तो प्राणी जतन करून ठेवणे
याला ‘टॅक्सीडर्मी’ म्हणतात. भारतीय लष्कराच्या संग्रहालयासाठी तयार करण्यात आलेली ‘खेचरा’ची अशीच एक टॅक्सीडर्मी लवकरच नाशिकला रवाना करण्यात येणार आहे.
या टॅक्सीडर्मीचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच नाशिक येथील भारतीय लष्कराच्या संग्रहालयातील तोफखाना केंद्रात प्रशिक्षणाचा भाग म्हणून हे खेचर दाखल करण्यात येईल. बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव जतन केंद्र येथे ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. भारतीय लष्करातील प्रशिक्षणार्थींना अभ्यास करण्यासाठी खेचराची टॅक्सीडर्मी तयार करण्यात आली आहे. डोंगरी भागात खेचर या प्राण्याचा उपयोग तोफांसहित तोफगोळे वाहून नेण्यासाठी होतो. स्वभावाने शांत असणारा हा प्राणी सहजरीत्या ७0 ते ८0 किलो वजन वाहून नेतो. शिवाय, सैन्यदलाचे अन्नधान्य या प्राण्याद्वारे वाहून नेले जाते. या खेचराच्या टॅक्सीडर्मीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना लवकरच धडे गिरवता येणार आहेत.
टॅक्सीडर्मी हा चर्मकला, सुतारकाम, शिल्पकला, रंगकला आणि शरीररचनाशास्त्र या पाच कला आणि शास्त्रांचा मेळ साधून
केली जाते. ही कला अनेक टप्प्यांची आणि किचकट असल्याचे टॅक्सीडर्मीस्ट डॉ. संतोष गायकवाड सांगतात. लष्कराचे हे खेचर तयार करण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागल्याचे त्यांनी सांगितले. ही टॅक्सीडर्मी हवाबंद काचपेटीत ठेवली जाते. ती ८0 ते ९0 वर्षे टिकते. त्यासाठी किंचितशी देखभालही आवश्यक असल्याचे डॉ. गायकवाड नमूद करतात.
टॅक्सीडर्मीसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यजीव जतन केंद्राच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. १ ऑक्टोबर २00९ रोजी उभारण्यात आलेले हे केंद्र भारतातील एकमेव आहे. तेव्हापासून या केंद्रात डॉ. संतोष गायकवाड यांनी अनेक प्राणी, पक्षी आणि मासे यांच्या टॅक्सीडर्मी तयार केल्या आहेत.
दुसरा मोर राजभवनात जाण्यास सज्ज!
राजभवन येथे माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी २0१२ साली एका मोराची टॅक्सीडर्मी तयार करून घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा जून २0१४मध्ये राजभवनातील दुसर्या मोराचा मृत्यू झाला. या मोराचीही टॅक्सीडर्मी वन्यजीव जतन केंद्रात डॉ. गायकवाड यांनी तयार केली आहे. ही टॅक्सीडर्मी राजभवनात जाण्यासाठी सज्ज झाली असून, येत्या आठवड्यात तिची रवानगी करण्यात येईल.