संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशना आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यामध्ये त्यांनी 'प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेसाठी पाऊस खूप महत्त्वाचा आहे. येत्या काळात देशाला त्याचा फायदा होईल. हे पावसाळी अधिवेशन देशासाठी अभिमानास्पद आहे.'
"मान्सून हा नवोपक्रम आणि नवनिर्मितीचे प्रतीक आहे. आतापर्यंतच्या बातम्यांनुसार, देशात हा हंगाम खूप चांगला सुरू आहे. शेतीसाठी फायदेशीर हंगामाचे वृत्त आहे. शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेत, देशाच्या अर्थव्यवस्थेत, ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत पाऊस महत्त्वाचा आहे. गेल्या १० वर्षांपेक्षा यावेळी ३ पट जास्त पाणीसाठा आहे, यामुळे येत्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल",असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. "ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, २२ मिनिटांत, दहशतवाद्यांच्या मालकांची घरे जमीनदोस्त करण्यात आली. मेड इन इंडिया लष्करी शक्तीच्या या नवीन स्वरूपाकडे जग खूप आकर्षित झाले आहे. आजकाल, जेव्हा जेव्हा मी जगातील लोकांना भेटतो तेव्हा भारताने बनवलेल्या मेड इन इंडिया शस्त्रांबद्दल जगाचे आकर्षण वाढत आहे", असंही मोदी म्हणाले.
'नक्षलवाद आणि माओवाद संपत आला
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज आपले सुरक्षा दल नक्षलवाद संपवण्यासाठी एका नवीन आत्मविश्वासाने आणि संकल्पाने पुढे जात आहेत. आज अनेक जिल्हे नक्षलवादापासून मुक्त आहेत. देशात माओवाद आणि नक्षलवादाची व्याप्ती कमी होत आहे. आपल्या देशाचे संविधान बंदुकीसमोर जिंकत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. पूर्वी रेड झोन असलेले झोन आता देशासाठी ग्रीन झोन बनत आहेत.