नवी दिल्ली : महाराष्ट्रात झालेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक’ देशपातळीवर कायद्याच्या रूपात आले पाहिजे, तीच डॉ. नरेंद्र दाभोेलकर यांना आदरांजली असेल, अशी अपेक्षा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, २० आॅगस्ट हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा दिवस ‘ब्लॅक- डे’ म्हणून स्मरणात राहील.डॉ. दाभोलकर यांच्या ‘अंधश्रध्दा उन्मूलन : विचार, आचार व सिध्दांत’ या तीन खंडाचे प्रकाशन शुक्रवारी उपराष्ट्रपती अन्सारी यांच्या हस्ते उपराष्ट्रपती भवनातील परिषद सभागृहात झाले.या शानदार कार्यक्रमाला भारतीय ज्ञानपीठचे अध्यक्ष डॉ. नामवरसिंग, ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झालेले साहित्यिक भालचंद्र नेमाडे, सुनीलकुमार लवटे, खा. हुसेन दलवाई, दाभोलकर यांची कन्या मुक्ता, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सुधीर निंबाळकर, अशोक माहेश्वरी व तीनही खंडांचे अनुवादक आदी उपस्थित होते.लेखी भाषण बाजुला ठेऊन उपराष्ट्रपती अन्सारी म्हणाले डॉ. दाभोलकर याचे कार्य एका छापील कागदावरून सांगणे चुकीचे होईल. राष्ट्रीय विचार देशाला सांगणाऱ्या व्यक्तीचा खून होतो, ते क्लेषकारक आहे. जग बदलत आहे, देश घडतो आहे. २१ व्या शतकात आपण वावरतो आहोत.पण आपले विचार बुरसटलेले आणि सुधारणेशी विसंगत आहेत. २१ व्या शतकात अंधश्रध्दा निर्मुलनाचा कायदा करावा लागणे म्हणजे देशाच्या चारित्र्याचा पुनर्विचार गरजेचा आहे. ज्या व्यक्तीने कधीच कुणाचे नुकसान केले नाही. उजेडाची गोष्ट सांगितली. पण अजब घडले. ज्या देशात मोठे ऋषी होऊन गेले. जगाला बोध देणारे तत्वज्ञ झाले, त्या भारतातील नागरिकांना राष्ट्रीय विचार समजावून सांगावा लागतो, हे दुर्दैव म्हणायला हवे. मुक्ता दाभोलकर यांनी डॉ. दाभोलकरांच्या कार्याची माहिती सांगितली, तेव्हा डॉ. अन्सारी म्हणाले, डॉ. दाभोलकर हा विचार आहे, तो मी जाणतो. (विशेष प्रतिनिधी)
‘अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक’ देशभर लागू व्हावे!
By admin | Updated: February 28, 2015 00:42 IST