राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी गावात काल शुक्रवारी (२५ जुलै २०२५) रोजी सकाळी एका सरकारी शाळेत मोठी दुर्घटना घडली. सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान शाळेच्या इमारतीचे छत अचानक कोसळला. या अपघातात सात मुलांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या सातही मुलांवर आज शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान, एका मुलीच्या अंत्यसंस्कारात टायरचा वापर झाल्याने प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पाच मुलांचे अंत्यसंस्कार गावातच एकत्रितपणे करण्यात आले. दोन मुलांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले. यादरम्यान, पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
सरकारी शाळेत इतक्या दुर्दैवी अपघातानंतरही स्थानिक प्रशासनाने निष्काळजीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आज पायल या मुलीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दुचाकी आणि सायकलच्या टायरचा वापर करण्यात आला. यामुळे प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने आधी लक्ष दिले असते तर एवढा मोठा अपघात झाला नसता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या इमारतीच्या जीर्ण अवस्थेबद्दल प्रशासनाला अनेक वेळा माहिती देण्यात आली होती, परंतु निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली, असा आरोप गावकऱ्यांनी केला.
दरम्यान, घटनास्थळी रेंज आयजी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अजय सिंह राठोड म्हणाले की, त्रुटींची तपासणी केली जात आहे आणि चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.