इन्फोसिसच्या म्हैसूरमधील कॅम्पसमध्ये घुसलेल्या एका अनाहुत पाहुण्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाल्याची घटना आज वर्षातील शेवटच्या दिवशी घडली. त्याचं झालं असं की, इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एक बिबट्या घुसला. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सूचना देण्यात आली. तर प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना एका दिवसाची सुट्टी देण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी पहाटे साडे तीनच्या सुमारास कॅम्पसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या दिसून आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १५० एकर पसरलेल्या या परिसरात बिबट्याचं वास्तव्य आहे. त्याला पकडण्यासाठी एक टास्क फोर्स तैनात करण्यात आली आहे. इन्फोसिसच्या एचआर डिपार्टमेंटने एक अंतर्गत ईमेल पाठवून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सूचना दिली. तसेच कंपनीच्या कॅम्पसमध्ये कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असेही सांगितले. तर प्रशिक्षणार्थींना आपल्या हॉस्टेलमध्ये राहण्याचे आणि सेल्फ स्टडीज करण्याची सूचना दिली होती. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅम्पसमध्ये बिबट्या असल्याची माहिती पहाटे ४ वाजता मिळाली होती. त्यानंतर ५ वाजता आम्ही संपूर्ण टीमसह घटनास्थळी पोहोचलो. तसेच कारवाई सुरू केली. बिबट्याला पकडण्यासाठी आम्ही दिवसा ड्रोनचा वापर करू. तर रात्री थर्मल ड्रोनचा वापर केला जाईल.वन विभागाच्या टीमने बिबट्याला ट्रॅक करण्यासाठी शोधमोहिम सुरू केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते हा बिबट्या भोजनाच्या शोधात राखीव जंगलातून भटकून कॅम्पसमध्ये आला असावा. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आपली चिंता व्यक्त केली. तसेच कंपनीने केलेल्या सुरक्षा उपायांचं कौतुक केलं. या स्थितीमध्ये कंपनीने त्वरित आणि प्रभावी पावलांमुळे आम्ही संतुष्ट आहोत, असेही अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले.