चुरू/ रोहतक : राजस्थानातील चुरु जिल्ह्यातील रतनगड तहसीलमधील भानुदा गावात ९ जुलै रोजी भारतीय हवाई दलाच्या जग्वार लढाऊ विमान अपघातात शहीद झालेले स्क्वाड्रन लीडर लोकेंद्र सिंह सिंधू (वय ३१) आणि फ्लाइट लेफ्टनंट ऋषिराज सिंह देवरा (वय २१) यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद ऋषिराज सिंह देवरा हे राजस्थानातील पाली जिल्ह्यातील खिवंडी गावचे रहिवासी होते. लोकेंद्र यांचे अंत्यसंस्कार रोहतकमधील देव कॉलनीतील शीला बायपास येथील रामबाग येथे करण्यात आले. ऋषिराज सिंह यांचे अंत्यसंस्कार राजस्थानातील पाली जिल्ह्यातील खिवंडी या मूळ गावी करण्यात आले.
अपघाताच्या कारणांचा शोधदोन आसनी जॅग्वार विमान बुधवारी भानुदा गावाजवळ नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळले. यात कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झाले नाही. हवाई दलाने सांगितले की, अपघाताची कारणे शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लग्नाची तयारी सुरू असतानाच आली बातमी...लेफ्टनंट ऋषिराज सिंह देवरा यांच्या लग्नाची तयारी घरात सुरू असतानाच, आता त्यांच्या घरावर शोककळा पसरली. आईवडील आपल्या मुलाला नवरदेवाच्या वेषात पाहण्याचे स्वप्न पाहत होते, पण त्यांच्या मुलाचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळल्याने त्यांची स्वप्ने कायमची भंगली. ऋषिराज सिंह २०२३ मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाले होते व सुरतगड एअरबेसवर तैनात होते.
एक महिन्यापूर्वीच मिळाले होते पिता होण्याचे सुखजग्वार अपघाताच्या ३ तास आधी स्क्वाड्रन लीडर लोकेंद्र यांनी त्यांच्या भावाशी संपर्क साधला होता. सिंधु यांचे कुटुंबीय गुरुवारी रोहतकमध्ये लोकेंद्र यांच्या मुलाचा पहिल्या महिन्याचा वाढदिवस साजरा करणार होते. एका महिन्यापूर्वी १० जून रोजी लोकेंद्र हे पिता झाले होते. त्यानंतर ३० जून रोजीच ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते.