अहमदाबाद - शहरातील एका खासगी शाळेतील ८ वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता ही मुलगी शाळेत पोहचली होती. शाळेतील पायऱ्या चढताना तिच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यानंतर वेदनेतच ती लॉबीतील बेंचवर बसली आणि काही सेकंदातच जमिनीवर कोसळली. या घटनेत शाळेतील कर्मचाऱ्यांनी तातडीने तिला उपचारासाठी हॉस्पिटलला नेले मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्राथमिक अंदाजानुसार या शाळकरी मुलीचा कार्डिएक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. शाळेतील मुख्याध्यापिका शर्मिष्ठा सिन्हा यांनी सांगितले की, ही मुलगी रोजप्रमाणे शाळेत आली होती. त्यावेळी अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले. कर्मचाऱ्यांनी १०८ वर कॉल करून तात्काळ रूग्णवाहिका बोलावली परंतु ती शाळेत पोहचायला उशीर झाला. त्यामुळे स्टाफने तिला कारनेच तातडीने रुग्णालयात नेले मात्र तिथे तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
आई वडील मुंबईत राहतात...
मृत गार्गीचे आई वडील मुंबईत राहतात तर ती अहमदाबाद येथे तिच्या आजी आजोबांसोबत राहते. घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. क्राइम ब्रान्चच्या टीमने शाळेत तपासणी केली. गार्गीला सामान्य लहानपणीचे आजार, सर्दी, खोकला, ताप असायचा परंतु तिला कोणतीही गंभीर समस्या नव्हती. गार्गी पूर्णपणे ठीक होती मात्र तिच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. जायडस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी गार्गीला कार्डिएक अरेस्ट आल्याची शंका उपस्थित केली आहे. परंतु पोस्टमोर्टम रिपोर्टनंतरच गार्गीच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे.
दरम्यान, गुरुवारी अशीच एक घटना समोर आली होती. कर्नाटकच्या चामराजनगर येथे सेंट फ्रान्सिस स्कूलमध्ये तेजस्विनी नावाची मुलगी क्लासरूममध्ये टीचरला तिची कॉपी दाखवण्यासाठी जात असताना जागेवरून उठली आणि बेशुद्ध पडली. तेजस्विनीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्याठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आले. या मुलीच्या मृत्यूचं कारणही कार्डिएक अरेस्ट सांगितले गेले.