नवी दिल्ली : सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपासाठी ‘सामनावीर’ ठरलेले पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी चालविलेल्या प्रचारात आपले धोरण आणि स्थानिक परिस्थिती यांचा ताळमेळ न साधल्याने आणि त्यांच्या भाषणाची पातळीही घसरल्याने त्यांच्या पक्षाची मोठी पंचाईत झाली आहे. शहा हे मुख्यत्वे राज्यातील काँग्रेस सरकारवर सर्व ताकदीनिशी प्रहार करीत आहेत.
शहा यांच्या हरियाणातील या आक्रमक प्रचाराने सतत तिस:या दिवशीही चुकीच्या कारणावरून मीडियाचे लक्ष वेधले. पश्चिम उत्तर प्रदेशचा डॉन समजला जाणारा धर्मपाल यादव (डी. पी. यादव) हा अमित शहा यांच्या अंबाला, भिवानी आणि तोहाना येथील प्रचार सभेदरम्यान चक्क व्यासपीठावर बसलेला दिसला. त्यातच अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. ‘ईव्हीएम यंत्रचे बटन इतक्या जोरात दाबा की त्याचा आवाज थेट इटलीत ऐकू आला पाहिजे,’ असे आवाहन शहा यांनी हरियाणाच्या मतदारांना मंगळवारच्या सभेत केले होते.
बुधवारी हिस्सार येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी हद्दच ओलांडली आणि मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांना ‘मुजरेवाला’ असे संबोधले. ‘ये पहेलवानो की भूमी है. इस भूमी का मुखिया दिल्ली के दरबार मे मुजरा करता है,’ असे शहा म्हणाले. नितीश कटारा ऑनर किलिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आलेला डी. पी. यादव हा यावेळी शहा यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेला होता. शहा म्हणाले, ‘राज्य सर्वच क्षेत्रत मागे पडले आहे आणि बेरोजगारी, दलितांवरील अत्याचार आणि महिला सुरक्षेच्या बाबतीतही राज्याची कामगिरी खराब आहे.’
भाजपाच्या नेत्यांनी मात्र शहांच्या वक्तव्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. ‘हा डी.पी. यादव कोण आहे? आम्ही त्याला ओळखत नाही. तो आमच्या प्रचार सभेत कसा आला आणि त्याला कुणी निमंत्रित केले हे आम्हाला ठाऊक नाही,’ असे भाजपाचे ज्येष्ठ नेते, हरियाणाचे प्रभारी खासदार कैलाश विजयवर्गीय म्हणाले.