Indian Immigrants Deported News: पहिल्या खेपेत १०४ अवैध भारतीयांना अमेरिकेने भारतात आणून सोडले. त्यानंतर आता आणखी ४८७ अवैधपणे राहत असलेल्या भारतीयांची ओळख पटवण्यात आली असून, त्यांनाही परत पाठवले जाणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. अवैध भारतीयांना परत पाठवताना देण्यात आलेली वागणूक हा गंभीर मुद्दा असून, तो अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करणयात आला आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली.
एका पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, 'अमेरिकेने भारताला ४८७ संभाव्य नागरिकांबद्दल माहिती दिली आहे. त्यांना परत पाठवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.'
'आम्ही अमेरिकेन प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले आहे की, निर्वासित भारतीयांसोबत कोणताही अमानवीय वागणूक सहन केली जाणार नाही. जर अशा प्रकारची वागणूक दिली जात असल्याचे आम्हाला कळले, तर आम्ही लगेच वरच्या स्तरावर हा मुद्दा उपस्थित करू', अशी माहिती मिस्त्री यांनी दिली.
अमेरिकेकडे माहिती मागितली होती
विक्रम मिस्त्री म्हणाले, 'नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया नवीन नाहीये. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेतही याबद्दल माहिती दिली आहे. अलिकडेच जेव्हा चर्चा झाली, तेव्हा भारताने अमेरिकेकडे परत पाठवण्यात येणाऱ्या संभाव्य नागरिकांची माहिती मागितली होती.'
'आता आम्हाला कळवण्यात आले आहे की, ४८७ भारतीयांना परत पाठवण्याचा आदेश काढण्यात आला आहे. अवैध प्रवाशांना परत पाठवण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्या तुलनेत यावेळची प्रक्रिया वेगळ्या स्वरूपाची आहे', असे उत्तर मिस्त्री यांनी लष्करी विमानातून प्रवाशांना पाठवण्याच्या प्रश्नावर दिले.