भारत सरकारने सैन्याला पाकिस्तानवर कारवाई करण्यास फ्री हँड देताचं पाकिस्तानला दहशतवाद पोसायला लावणाऱ्या अमेरिकेमध्ये खळबळ उडाली आहे. इतिहासात डोकावून पाहिले तर पाकिस्तानसोबतच्या युद्धात प्रत्येकवेळी अमेरिकेने पाकिस्तानला साथ दिली आहे. बांगलादेश युद्धावेळी तर अमेरिकेने भारतावर हल्ला करण्यासाठी एअरक्राफ्ट कॅरिअर पाठविले होते. आता अमेरिका भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करू लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच अमेरिका दहशतवादाविरोधात लढाईसाठी भारतासोबत असल्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले होते. परंतू, आता जेव्हा भारताने दहशतवादाविरोधात कारवाईसाठी सैन्याला खुली छुट दिल्याचे जाहीर करताच पाकिस्तानला वाचविण्यासाठी अमेरिका सक्रीय झाली आहे. यामुळे मंगळवारी रात्री युएनने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला होता. युएनच्या महासचिवांनी कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे. अशातच आता अमेरिका परराष्ट्र मंत्र्यांना फोन करणार आहे.
अमेरिकेसाठी आम्ही सोव्हिएत संघाविरोधात दहशतवादी तयार केल्याचा खुलासा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी केला होता. यावर अमेरिका अवाक्षरही काढू शकलेली नाही. आज झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या परराष्ट्र प्रवक्त्या टैमी ब्रूस यांना याबाबत विचारण्यात आले, परंतू त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. परंतू, भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो दोन्ही देशांच्या समकक्ष मंत्र्यांशी फोनवर चर्चा करतील असे म्हटले आहे.
रुबियो आज किंवा उद्या दोन्ही देशांच्या नेत्यांशी बोलतील. हा तनाव वाढू नये, असे आम्हाला वाटत असल्याचे ब्रूस यांनी म्हटले आहे. भारताच्या फ्री हँडनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने मध्यरात्रीनंतर २ वाजता पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये भारत येत्या २४ ते ३६ तासांत पाकिस्तानवर हल्ला करण्याची गुप्त माहिली मिळाली असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. एलओसीवर गेल्या सहा दिवसांपासून पाकिस्तानकडून गोळीबार होत आहे, आज पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार केला आहे. मोर्टारही डागले जात आहेत. भारताकडूनही या कृत्याला जोरदार प्रत्यूत्तर दिले जात आहे.