नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणो हाताळण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाकरिता अतिरिक्त सत्र न्यायाधीश भारत पाराशर यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. ज्येष्ठ वकील आर.एस. चिमा हे
विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहतील.
न्यायालयाने विशेष न्यायाधीश व विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबत दोन आठवडय़ांत अधिसूचना जारी करण्याचा आदेश सक्षम प्राधिकरणाला दिला आहे. या न्यायालयाची सुनावणी दैनंदिन आधारावर राहील, यात सर्वोच्च न्यायालयाखेरीज अन्य कोणत्याही न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाच्या सेवेतील अधिकारी असलेल्या भारत पाराशर यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासंबंधी अधिसूचना जारी करण्याचा आदेश आम्ही संबंधित प्राधिकरणाला देत आहोत.
भादंवि, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, काळा पैसा प्रतिबंधक कायदा व संबंधित गुन्ह्यांची कोळसा वाटपाशी निगडित प्रकरणो ते हाताळतील. या आदेशापासून दोन आठवडय़ांत अधिसूचना जारी केली जावी, असे सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय खंडपीठाने स्पष्ट केले.
चिमांची मदत..
आर.एस. चिमा हे चंदीगडचे ज्येष्ठ फौजदारी वकील असून ते सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या (ईडी) प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)