हैदराबाद - एमआएमचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी तेलंगणा सरकारकडे हैदराबाद शहरातील मंदिर आणि एका मशिदीच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणी केली आहे. त्यावर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे.
एका सरकारी प्रसिद्धपत्रकात म्हटले की, ओवेसी यांनी रविवारी प्रगती भवन येथे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात शहरातील सिंहवाहिनी महाकाली मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 10 कोटी रुपये आणि अफलजगंज मशिदीच्या पुनर्बांधणीसाठी 3 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. ओवेसी यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री राव यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे. तसेच लवकरच निधी देण्याचे आश्वासन दिले.
अकबरुद्दीन ओवेसे हे असुद्दीन ओवेसी यांचे बंधू आहेत. सध्या असुद्दीन ओवेसी केंद्र सरकारच्या रणनितीवर नाराज आहेत. नागरिकता संशोधन विधेयक आणि एनआरसी या कायद्यावरून ओवेसी आक्रमक आहेत. तर अकबरुद्दीन ओवेसी आपल्या आक्रमक भाषणासाठी सर्वांनाच परिचीत आहेत. मात्र त्यांनी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधी मागितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.