गेल्या महिन्यात एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाला भीषण अपघात झाला होता. या अपघातात प्रवाशांसह डॉक्टरी शिकणाऱ्यांसह इतर नागरिकांचा मृत्यू झाला होता. या विमानाचा अपघात कसा झाला, यावर सर्व तज्ञांचे एकच मत बनले आहे. ते म्हणजे इंजिनाला होणारा इंधन पुरवठा बंद झाला. तो जाणूनबुजून बंद केला की तांत्रिक कारणाने बंद झाला यावर अद्याप प्रकाश पडलेला नाही. परंतू, अमेरिकन एव्हीएशन तज्ञांनुसार पायलटनेच जाणूनबुजून किंवा चुकीने विमानाचा इंधनपुरवठा करणारा स्वीच बंद केला होता, असा दावा केला जात आहे. यासाठी आता विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड झालेले पायलटांचे संभाषण पुरावा मानले जात आहे.
न्यूज एजन्सी रॉयटर्सनुसार अमेरिकेचे वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने एक बातमी छापली आहे. त्यात विमानाचा कप्तान असलेल्या सुमित सभरवाल यांनी इंजिनाचा इंधन पुरवठा बंद केल्याचे म्हटले आहे. वॉल स्ट्रीटनुसार दोन्ही पायलटमध्ये झालेले संभाषण कॉकपिटमध्ये रेकॉर्ड झाले आहे.
सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर यांनी कॅप्टन सुमित सभरवाल यांना इंजिनाचा इंधन स्विच 'कटऑफ' स्थितीत का ठेवला असा सवाल केला होता. सह-वैमानिक आश्चर्यचकित झाला होता, तसेच त्याच्या आवाजात भीती होती. तर कॅप्टन सुमित शांत होते. कुंदर यांना ३,४०३ तास उड्डाणाचा अनुभव होता तर सभरवाल यांना १५,६३८ तास उड्डाणाचा अनुभव होता.
वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या अहवालात विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सुरुवातीच्या तपासाशी संबंधीत लोकांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. या अहवालावर भारताच्या विमान अपघात तपास ब्युरो (AAIB), नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA), नागरी विमान वाहतूक मंत्रालय, बोईंग किंवा एअर इंडियाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.