नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी देशाचे राष्ट्रपती बनण्यास पात्र आहेत़ त्यांच्या उत्तुंग कार्याला शोभून दिसेल असे हे पद आहे, असे केंद्रीय मंत्री व पक्ष नेते नितीन गडकरी यांनी म्हटले आह़े
एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात गडकरी बोलत होत़े आडवाणी उपपंतप्रधान होते व त्यांना लोकसभाध्यक्ष बनविणो योग्य ठरले नसत़े ते देशाच्या राष्ट्रपतिपदासाठी पात्र आहेत़ आम्ही सर्व त्यांचा अपार आदर करतो आणि त्यांच्या उत्तुंग व्यक्तित्त्वाला साजेसे पद त्यांना मिळायला हवे, असे आम्हाला वाटते, असे गडकरी म्हणाल़े
लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही, यामागचे कारणही गडकरींनी स्पष्ट केल़े 75 वयोमर्यादेवरील नेत्यांना मंत्रिपद दिले जाऊ नये, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विवेकी निर्णय होता़ या निर्णयाचा सन्मान करीत आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही, असे त्यांनी सांगितल़े
अमिताभ बच्चन आता चित्रपटात नायकाची भूमिका साकारत नाहीत़ कारण पिढी बदलली आहे, असे सांगत पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांची तुलना त्यांनी बॉलिवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चनशी केली़ मुरली मनोहर जोशी योजना आयोगाचे उपाध्यक्ष बनू इच्छितात, हे मीडियातील वृत्त गडकरींनी फेटाळून लावल़े जोशी हे आमचे थिंकटँक आहेत़ आमचे ज्येष्ठ नेते आहेत़ आमचा पक्ष निश्चितपणो त्यांचा अनुभव व ज्ञानाचा सुयोग्य वापर करेल, असे गडकरी म्हणाल़े
(लोकमत न्यूज नेटवर्क)