ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. २८ - अभिनेत्री नर्गिस फक्रीला कर्नाटकमधील वनखात्याच्या स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या जवानांनी 'गार्ड ऑफ ऑनर' दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. गार्ड ऑफ ऑनर वरिष्ठ सरकारी अधिकारी, मंत्री, या पदावरील व्यक्तींनाच दिले जात असतानाच एका अभिनेत्रीला हा मान कसा दिला जातो असा सवाल आता उपस्थित होत आहे.
एका वृत्तवाहिनीच्या सेव्ह टायगर या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी नर्गिस फक्री कर्नाटकमधील नागरहोल व्याघ्र प्रकल्पात गेली होती. यादरम्यान काबिनी आणि उदभूर या चेक पोस्टवर स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या जवानांनी नर्गिसला गार्ड ऑफ ऑनर दिला. हा सर्व प्रकार सहाय्यक वनसंरक्षकांच्या उपस्थितीत सुरु होता. या प्रकारावर आता तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एका अभिनेत्रीला गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी आम्ही एसटीपीएफमध्ये भरती झालो नाही अशा शब्दात एका जवानाने त्याची नाराजी व्यक्त केली. 'शाहरुख खानही उद्या आमच्या व्याघ्र प्रकल्पात आला तर आम्ही त्याला गार्ड ऑफ ऑनर देऊच शकत नाही असेही या जवानाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तर वरिष्ठ पातळीवरुन आदेश आल्याने आम्ही इच्छा असूनही विरोध दर्शवू शकलो नाही असे अन्य एका जवानाने प्रसारमाध्यांशी बोलताना सांगितले. अभिनेत्रीचा मान पण जवानांचा अपमान करणा-या या कृत्याची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही बंगळुरुत जोर धरु लागली आहे. याप्रकरणावर वनखात्यातील वरिष्ट अधिका-यांन प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
कोणाला दिला जातो गार्ड ऑफ ऑनर
पोलिस आणि वन्य खात्याच्या नियमावलीनुसार राष्ट्रपती, पंतप्रधान,मुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. राज्याच्या सरकारी पाहुण्यांनाही हा सन्मान दिला जाऊ शकतो. पण कोणत्याही पदावर नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तीला राज्य सरकारच्या आदेशानंतर गार्ड ऑफ ऑनर दिला जाऊ शकतो.