ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १२ - सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलणा-या एका अभिनेत्रीला चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दिग्दर्शक, संबंधीत अभिनेत्री व एका महिला दलालाला अटक केली असून पिडीत मुलीची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.
चेन्नईतील समाजसेवी संस्थेला दक्षिणेतील सिनेमांमध्ये काम करणा-या अभिनेत्रीने तिच्या पोटच्या मुलीलाच वेश्या व्यवसायात ढकलल्याची माहिती मिळाली होती. या संस्थेने पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावला. संस्थेचे दोन कार्यकर्ते अभिनेत्रीच्या मुलीचे छायाचित्र घेऊन राजेश्वरी नामक महिलेकडे दिले. या मुलीसाठी दीड लाख रुपये मोजावे लागतील असे राजेश्वरीने सांगितले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दहा हजार रुपये दिले व उर्वरित पैसे मुलीला बघितल्यावर देऊ असे सांगितले. यानुसार राजेश्वरी त्या मुलीला घेऊन हॉटेलमध्ये दाखल झाली. मुलीची ओळख पटताच पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड टाकून तिची सुटका केली.
पिडीत मुलीची आई अभिनेत्री असून मुलीनेही अभिनेत्री व्हावे असे तिला वाटत होते. हा प्रकार राजेश्वरी व दक्षिणेतील दिग्दर्शक सेंथामिल अरासू यांना समजला. त्यांनी अभिनेत्रीशी संपर्क साधून तिच्या मुलीला सिनेसृष्टीत काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यामोबदल्यात तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. या धक्कादायक प्रकारात अभिनेत्रीनेही राजेश्वरी व आरोपी दिग्दर्शकाला साथ दिली. पिडीत मुलीला सिनेसृष्टीत काम देण्याच्या बहाण्याने आरोपी दिग्दर्शकाने त्या मुलीला अनेकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच त्यानेही पिडीत मुलीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. पिडीत मुलीने दक्षिणेत सिनेमांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. तर तिच्या आईनेही दक्षिणेतील मालिका व काही सिनेमांमध्ये काम केले आहे.