स्वामींवर कारवाईचा इशारा

By admin | Published: April 29, 2016 05:06 AM2016-04-29T05:06:54+5:302016-04-29T05:06:54+5:30

काँग्रेसच्या रोषाला बळी पडलेले भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा राज्यसभेत वादग्रस्त विधान केले.

Action alert on the owner | स्वामींवर कारवाईचा इशारा

स्वामींवर कारवाईचा इशारा

Next

नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यावरून उद्भवलेल्या वादात सोनिया गांधी यांनाही गोवण्याचा प्रयत्न करून बुधवारी काँग्रेसच्या रोषाला बळी पडलेले भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा राज्यसभेत वादग्रस्त विधान केले. परंतु उपसभापती पी. जे. कुरियन यांनी त्यांचे हे विधान तत्काळ कामकाजातून वगळले आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांना विनाकारण चिथावणी दिल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा स्वामींना दिला. अन्य देशाच्या संविधानाबाबत स्वामींनी हे वादग्रस्त विधान केले. त्याचा काँग्रेस सदस्यांनी निषेध केला. स्वामींचे हे विधान प्रसिद्ध करू नका, असे कुरियन यांनी मीडियाला सांगितले.
दरम्यान, हेलिकॉप्टर सौद्यात लाच मिळालेल्या लाभार्थींची नावे सांगा, असे आव्हान भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिले त्यावर नावे हुडकून काढणे हे तपास संस्थांचे काम आहे, असे सांगत काँग्रेसने भाजपावर पलटवार केला आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी लाच घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि भाजपाने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असे सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी म्हटले आहे. हेलिकॉप्टर सौद्यातील कथित भ्रष्टाचारावरून राजकीय वातावरण तापले असताना अमित शाह यांनी गुरुवारी सोनिया गांधींवर थेट हल्ला चढविला. शाह यांच्या वक्तव्यावर पटेल म्हणाले, मागील दोन वर्षांपासून ते (भाजपा) सत्तेत आहेत. त्यांनीच लाच घेणाऱ्यांना शोधले पाहिजे. पण तेच उलट आम्हाला विचारत आहेत. लाच कुणी घेतली हे शोधणे तपास संस्थांचे काम आहे. निराधार आरोप करणाऱ्यांना आपण घाबरत नाही, असे सोनिया गांधींना म्हणायचे होते. आपण आयुष्यात कधी लाच घेतलेली नाही, असेही ते एका प्रश्नावर उत्तरले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीत झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अन्य काही राजकीय नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी करणार आहे.

Web Title: Action alert on the owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.