चुराचंदपूर : विविध संघटनांना हिंसेचा मार्ग सोडण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचे सरकार मणिपूरच्या जनतेसोबत ठामपणे उभे आहे. हे संघर्षग्रस्त राज्य शांतता व समृद्धीचे प्रतीक बनावे याकरिता केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचार उसळला. त्यानंतर पंतप्रधान प्रथमच या राज्याच्या दौऱ्यावर आले.
कुकी लोकांची बहुसंख्या असलेल्या चुराचंदपूर जिल्ह्यात जाहीर सभेत मोदी म्हणाले, मणिपूर ही आशा-आकाक्षांची भूमी आहे. या सुंदर प्रदेशावर हिंसेचे सावट आहे. हिंसाचाराचा तडाखा बसलेल्या लोकांना मी मदत शिबिरात भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. मणिपूर सध्याच्या स्थितीतून सावरेल अशी खात्री आहे. कोणत्याही भागात विकास होण्यासाठी तिथे शांतता आवश्यक आहे. गेल्या ११ वर्षात ईशान्य भारतातील अनेक संघर्ष, वाद मिटविण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)
'मणिपूरची वेगाने प्रगती'
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वी दिल्लीत घेतलेल्या निर्णयांची ईशान्य भारतात अंमलबजावणी होण्यास बराच काळ लागायचा; पण आता मणिपूर देशाच्या इतर राज्यांसोबत तितक्याच वेगाने प्रगती करत आहे.
पूर्वी डोंगराळ आणि आदिवासी भागात चांगली शाळा, रुग्णालये असणे ही एक स्वप्नवत गोष्ट होती. आज केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ही परिस्थिती बदलत आहे. चुराचंदपूरमध्ये आता वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आले आहे.
७३०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन
पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमध्ये ७३०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने देशभरात गरिबांसाठी पक्की घरे बांधली. मणिपूरमधील हजारो कुटुंबांनाही या योजनेचा लाभ झाला आहे. सात-आठ वर्षापूर्वी मणिपूरमध्ये केवळ २५-३० हजार घरांपर्यंतच पाणीपुरवठा होता. आज ३.५ लाखांहून अधिक घरांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.
मणिपूर या नावातच 'मणी' आहे. हा मणी संपूर्ण ईशान्य भारताचे भविष्य उज्ज्वल करील. इम्फाळहून चुराचंदपूरपर्यंत ६० किमीचा प्रवास रस्त्याने करताना जनतेचे मिळालेले प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
परस्पर संवादातून तोडगा काढण्याचा केंद्राचा प्रयत्न
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा १ आगडोंब उसळल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्या राज्याचा एकदाही दौरा न केल्याबद्दल काँग्रेससह विरोधकांनी सातत्याने टीका केली होती.
त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मणिपूरमधील डोंगराळ भाग, तसेच खोऱ्यामध्ये विविध गटांसोबत चर्चा करून शांततेसाठी करार करण्याचा प्रयत्न झाला. परस्पर संवादाच्या माध्यमातून केंद्र सरकारने विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पावले उचलली आहेत.
सर्व संघटनांनी हिंसेचा मार्ग 3 सोडून शांततेची कास धरायला हवी. याच मार्गाने तुमच्या स्वप्नांची पूर्तता होईल. ते साध्य होण्यासाठी केंद्र सरकार मणिपूरच्या जनतेसोबत आहे. या राज्याला समृद्धी, शांतता, प्रगतीचे प्रतीक बनवायचे आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.