सुधीर लंके, पुणेविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणावर आम आदमी पार्टीचे (आप) कार्यकर्ते राजधानी दिल्लीत दाखल झाले असून, स्थानिक कार्यकर्त्यांनंतर या प्रचारात महाराष्ट्राचा सर्वांत मोठा सहभाग आहे. याशिवाय राज्यातील साडेतीन हजार कार्यकर्ते ‘कॉलिंग कॅम्पेन’च्या माध्यमातून घरबसल्या दिल्लीच्या मतदारांना ‘आप’ला मत देण्याचे आवाहन करीत आहेत. दिल्ली पुन्हा काबीज करण्यासाठी ‘आप’ने कंबर कसली आहे. देशभरातून ‘आप’चे कार्यकर्ते दिल्लीत एकवटले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक साडेपाचशे कार्यकर्ते आहेत. त्यातही मुंबई-पुण्यातील कार्यकर्त्यांची संख्या जास्त असून, विदर्भातूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते गेले आहेत. पुणे व मुंबईत ‘आयटी’ क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हे दिल्लीच्या ‘वॉररूम’मधून ‘आप’च्या सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळत असल्याचे पक्षाचे राज्य संयोजक प्रा. सुभाष वारे यांनी सांगितले.स्थानिक कार्यकर्ते घराघरात जाऊन प्रचार करीत आहेत. तर इतर राज्यांतून आलेले स्वयंसेवक ‘बझ कॅम्पेन’ म्हणजे गर्दी असलेल्या चौकांत जाऊन पत्रके वाटणे, प्रचारफलक हातात घेऊन उभे राहणे, रिक्षा व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सायकलींना स्टिकर लावणे अशा पद्धतीने प्रचार करत आहेत. दिल्लीतील ‘फ्लॅश मॉब’ या अभियानातही राज्यातील कार्यकर्ते सहभागी आहेत. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी कार्यकर्ते सामूहिकपणे ‘पाच साल केजरीवाल’ या गाण्यावर नृत्य करून पक्षाचा प्रचार करत आहेत. ‘कॉलिंग कॅम्पेन’अंतर्गत राज्यातील ३ हजार ६०० कॉलर्सने आपले नाव पक्षाकडे नोंदविले आहे. ‘आप’ला मतदान करण्याचे आवाहन करणारे ५ लाख ६७ हजार कॉल देशभरातून दिल्लीत गेले आहेत. त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक १ लाख २० हजार कॉल गेले. पुण्यातील संगणक अभियंता अजिंक्य शिंदे हे या मोहिमेची राज्याची धुरा वाहत आहेत.
राज्यातील ‘आप’ कार्यकर्त्यांचा दिल्लीकरांशी ‘संवाद’
By admin | Updated: January 29, 2015 04:13 IST