सध्या देशात E20 मिश्रित पेट्रोलवरून एक नवीन वाद सुरू झाला आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर याबाबत पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केल्या होत्या. दरम्यान, आता गडकरी यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली असून गंभीर आरोप केले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान E20 मिश्रित पेट्रोलशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी हे आरोप केले. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, मला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी सोशल मीडियावर एक कॅम्पेन राबवण्यात आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या वार्षिक परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या दरम्यान, त्यांना पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबत चर्चेवर प्रश्न उपस्थित केले.
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
यावर केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर दिले.ते म्हणाले, ऑटोमोबाईल उत्पादक आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया सारख्या संस्थांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबत त्यांचे निष्कर्ष शेअर केले आहेत. तुमचा उद्योग ज्या पद्धतीने काम करतो, त्याच पद्धतीने राजकारण देखील काम करते, असे ते म्हणाले.
'राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी मोहीम'
सोशल मीडियावरील मोहीम पैसे देऊन करण्यात आली होती, असा आरोप त्यांनी केला. ती मोहीम फक्त मला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी होती. त्यात काहीही तथ्य नाही. सर्व काही स्पष्ट आहे. आयातीचा पर्याय किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी आहे, असंही गडकरी म्हणाले.
भारत जीवाश्म इंधनाच्या आयातीवर मोठा खर्च करतो. यासोबतच, त्यांनी विचारले की जीवाश्म इंधनाची आयात कमी करून वाचवलेले पैसे भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणे हे आर्थिकदृष्ट्या चांगले पाऊल नाही का? यावर गडकरी म्हणाले, आम्ही मक्यापासून इथेनॉल बनवले. या पावलामुळे शेतकऱ्यांना ४५,००० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
'प्रदूषण कमी करणे आवश्यक आहे यावर जग सहमत आहे. 'जर प्रदूषणाची ही पातळी अशीच राहिली तर दिल्लीतील रहिवाशांचे आयुष्य १० वर्षांनी कमी होईल, असं एका अहवालात सांगितल्याचे गडकरी म्हणाले.
E20 पेट्रोल म्हणजे काय?
E20 पेट्रोल हे ८० टक्के पेट्रोल आणि २० टक्के इथेनॉलच्या मिश्रणापासून बनवलेले इंधन आहे. केंद्र सरकार E20 मिश्रण कार्बन उत्सर्जन आणि जीवाश्म इंधन आयात कमी करण्यासाठी एक क्रांतिकारी बदल आहे असा आग्रह धरत आहे. पण उलट, वाहन मालकांनी वेगळाच दावा केला आहे. यामुळे इंधन कार्यक्षमता कमी झाली आहे आणि झीज वाढली आहे. यामुळे वाहनांचे आयुष्य कमी झाले आहे, असे वाहनचालकांनी म्हटले आहे.