बऱ्याचदा नियतीचा खेळ कुणालाही कळत नाही असं म्हणतात, प्रत्येकाच्या मनात काय चालतं हे माहिती नाही. मिर्झापूर येथील एक कुटुंब घरातील मुलीमुळे चिंतेत आहे. या कुटुंबातील १७ वर्षीय मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही. सामान्यत: मुलींना वयाच्या १३-१४ वयातच मासिक पाळी सुरू होते. मात्र मुलीला पाळी न आल्याने कुटुंबाने तिला प्रयागराज इथल्या हॉस्पिटलला नेले. या मुलीची डॉक्टरांनी तपासणी केली असता हे सत्य समोर आले त्याने सगळेच हैराण झाले.
तपासात ही मुलगी शारीरिकदृष्ट्या मुलगी असली तरीही तिच्या आतमधील अवयव पुरुषाचे असल्याचे कळले. तिच्या पुरुषांमधील अंडकोष आहेत. मुलीच्या शरीरात गर्भाशय नाही हे ऐकून कुटुंबासह डॉक्टरांनाही धक्का बसला. तपासणीनंतर या मुलीचे जेनेटिक टेस्ट झाले. त्यात ४६ XY गुणसूत्र आढळले, जे पुरुषांमध्ये आढळतात. डॉक्टरांनी हा अँड्रोजन इन्सेन्सिटिव्हिटी सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजार असल्याचे निदान केले. या मुलीचे समुपदेशन करण्यात आले असून तिच्या कुटुंबाच्या संमतीने, शस्त्रक्रियेद्वारे तिच्या शरीरातून अविकसित अंडकोष काढून टाकण्यात आले आणि हार्मोनल थेरपी सुरू करण्यात आली.
अविकसित अंडकोष डॉक्टरांनी बाहेर काढले
समुपदेशन करताना या मुलीने सांगितले की, मला लहानपणापासून मुलगी म्हणून सांभाळण्यात आले आहे. मी मानसिकदृष्ट्या मुलगीच आहे. यापुढेही मला मुलगी बनूनच राहायचे आहे. कुटुंबानेही त्यावर सहमती दर्शवली. या मुलीचं ऑपरेशन करण्यात आले. त्यात तिच्या शरीरातून अविकसित अंडकोष बाहेर काढण्यात आले जेणेकरून तिला पुढे कॅन्सरचा धोका होऊ नये.
गर्भाशय नसल्यानं कधीही आई होऊ शकणार नाही
आता या मुलीला फिजिशियन डॉ. अनुभा श्रीवास्तव यांच्याकडून हार्मोनल थेरेपी दिली जात आहे. यापुढे तिला आयुष्यभर थेरेपी द्यावी लागणार आहे. परंतु गर्भाशय नसल्याने आयुष्यात या मुलीला कधी आई होता येणार नाही असंही डॉक्टरांनी कुटुंबाला सांगितले.
काय आहे एआयएस?
अँड्रोजन असंवेदनशीलता सिंड्रोम (AIS) ही एक आनुवांशिक स्थिती आहे ज्यामध्ये शरीर पुरूष हार्मोनला प्रतिसाद देत नाही. यामुळे त्या व्यक्तींमध्ये आनुवांशिक दृष्ट्या पुरूष (XY गुणसूत्र) असूनही बाह्य शारीरिक वैशिष्ट्ये अनेकदा स्त्रिलिंगी असतात. हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. यामध्ये शरीर मुलीचे असते परंतु वैशिष्ट्ये मुलाची असतात.