नवी दिल्ली : भारतात प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बनावट पासपोर्ट किंवा व्हिसा वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. नवीन इमिग्रेशन विधेयकात ही तरतूद करण्यात आली आहे.
लोकसभेत सादर विधेयकानुसार, ‘जो कोणी जाणूनबुजून भारतात प्रवेश करण्यासाठी किंवा राहण्यासाठी किंवा भारताबाहेर जाण्यासाठी बनावट पासपोर्ट किंवा इतर दस्तऐवजाचा वापर करेल, त्याला सात वर्षांपर्यंत दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते.’ याशिवाय असे करणाऱ्या व्यक्तीला किमान एक लाख रुपये आणि जास्तीत जास्त दहा लाख रुपये दंडही आकारला जाईल. या विधेयकात हॉटेल, विद्यापीठे, इतर शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि नर्सिंग होमना परदेशी लोकांबद्दल माहिती देणे बंधनकारक करण्याची तरतूद आहे.