ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. ११ - छत्तीसगडमधील विलासपूरजवळील एका रुग्णालयात नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतर ७ महिलांचा मृत्यू झाला असून ३२ महिलांची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी सकरी येथे कानन पेंडारी जवळ असलेल्या नेमीचंद जैन रुग्णालयात आरोग्य विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नसबंदी शिबिरात ८३ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर महिला घरी गेल्या असता काही महिलांची तब्येत बिघडली. दुस-या दिवशी त्यांना विलासपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यानच सात महिलांचा मृत्यू झाला तर ३२ महिलांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.
आरोग्य विभागातील अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे महिलांना जीव गमवावा लागल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे गदारोळ निर्माण झाला असून जिल्हाधिका-यांनी या घटनेच्या चौकशीचे तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती नेमण्याचे व मृत महिलांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.