पाटणा: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यात निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष पुनरावलोकन मोहिमेनंतर प्रसिद्ध केलेल्या मतदारयाद्यांतून ६५ लाख जणांची नावे वगळण्यात आली आहेत. परिणामी राज्यातील नोंदणी झालेल्या मतदारांची एकूण संख्या ७.९ कोटींवरून घटून ७.२४ कोटी झाली आहेत.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, बिहारमधील पाटणा जिल्ह्यामध्ये ३.९५ लाख, मधुबनी ३.५२ लाख, पूर्व चंपारण ३.१६ लाख, आणि गोपालगंज ३.१० लाख जणांना मतदार यादीतून वगळण्यात आले. विशेष पुनरावलोकन मोहीम सुरू होण्यापूर्वी बिहारमध्ये ७.९ कोटी मतदार असल्याचे सांगण्यात आले होते; पण आता आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २२.३४ लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे, ३६.२८ लाख जण राज्याबाहेर कायमचे स्थलांतरित झाले आहेत किंवा दिलेल्या पत्त्यावर सापडले नाहीत, तसेच ७.०१ लाख जणांच्या नावांची मतदारयादीत एकाहून अधिक ठिकाणी नोंदणी झाली होती.
या मतदारयाद्यांचा मसुदा ऑनलाइन व राज्यातील सर्व ३८ जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या मतदारयाद्यांच्या छापील प्रती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात येत आहेत. ही प्रक्रिया १ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.