प्रयागराज : महाकुंभमध्ये आतापर्यंत ५४ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. भाविकांची ही संख्या अंदाजापेक्षा जास्त आहे असून दररोज सरासरी १ कोटींहून अधिक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
२६ जानेवारीपासून गेल्या २० दिवसांत सरासरी एक कोटींहून अधिक भाविक संगमात दररोज स्नान करत आहेत. मौनी अमावस्येला चेंगराचेंगरी झाली असली तरी, भाविक दररोज मोठ्या संख्येने येत राहिले, असेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते. सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १.३५ कोटी भाविकांनी संगमात स्नान केले.
बिहारमध्ये वैध तिकिटाशिवाय रेल्वेस्थानकात प्रवेश नाही
बिहारमधून महाकुंभला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वैध तिकीट असल्याशिवाय रेल्वेस्थानकावर प्रवेश नाकारण्यात येत आहे. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
आणखी दोन ठिकाणी आगीच्या घटना
महाकुंभातील श्री कपी मानस मंडळ आणि ग्राहक संरक्षण समितीच्या छावण्यांमध्ये सोमवारी आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग त्वरित आटोक्यात आणल्याने जीवितहानी टळली.
भाविकांनी असा ओलांडला ५४ कोटींचा टप्पा
१४ जाने. ३.५ कोटी
१७ जाने. ७.० कोटी
२० जाने. ८.८ कोटी
२१ जाने. ९.२ कोटी
२३ जाने. १०.० कोटी
२८ जाने. २०.० कोटी
१२ फेब्रु. ४८.० कोटी
१२ फेब्रु. ४८.० कोटी
१५ फेब्रु. ५० कोटी
१७ फेब्रु. ५४ कोटी
दिल्ली रेल्वेस्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था
नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर शनिवारी (दि. १५) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर स्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही समाधानकारक कारणाशिवाय कोणालाही पादचारी पुलावरून फिरण्यास व उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्रयागराजकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी फलाटावरील लोकांच्या संख्येवरही लक्ष ठेवलेजाणार आहे.
फलाट क्रमांक १३ ते १६ पर्यंतच्या फलाटांवर रेल्वेगाड्यांच्या डब्यांवर लक्ष ठेवण्यासाठी व गर्दीला नियंत्रित करण्यासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याबरोबरच जलद कृती दलही तैनात आहे.