भाेपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भाेपाळजवळच्या मेंडाेरी जंगलातून लाेकायुक्त पोलिस आणि आयकर विभागाने संयुक्तपणे टाकलेल्या छाप्यात ५२ किलो सोने जप्त केले आहे.
जप्त केलेल्या साेन्याची किंमत सुमारे ४० कोटी ४७ लाख रुपये आहे. हे सोने एका बेवारस एसयूव्हीमध्ये भरले होते. त्या गाडीत या मुद्देमालाव्यतिरिक्त १० काेटींची राेख रक्कमही हाेती. या प्रकरणाचा संबंध सरकारी अधिकारी, राजकीय नेते आणि रिअल इस्टेट व्यावसायिकांशी असल्याचा संशय आहे. प्राप्त माहितीनुसार, साेने एसयूव्हीमधून राज्याबाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याची याेजना हाेती.
यासंदर्भात सुगावा लागल्यानंतर १०० पेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर गाडीला जंगलात घेरले. मात्र, पाेलिसांनी कार ताब्यात घेतली त्यावेळी त्यात काेणीच आढळले नाही.
दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी भोपाळ आणि इंदूरमधील बांधकाम समूहाच्या ५१ ठिकाणांवर छापे टाकले होते. हे एक माेठे रॅकेट असल्याचा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे. (वृत्तसंस्था)
गाडी आरटीओच्या माजी कर्मचाऱ्याच्या नावावर
- जप्त केलेली एसयूव्ही ग्वाल्हेरमधील रहिवासी चेतन गाैर आणि साैरभ शर्मा या माजी आरटीओ कर्मचाऱ्यांच्या नावावर आहे.
- शर्मा आणि अनेक बांधकाम व्यावसायिकांची चाैकशी सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या साेन्याचा त्यांच्याशी संबंध असू शकताे, असा संशय आहे.