ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ६ - जम्मू काश्मीरमधील अरनिया, आरएस पुरा सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने गोळीबारात सीमारेषेवरील गावात राहणा-या पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ३० नागरिक या गोळीबारात जखमी झाले असून भारतीय सैन्यानेही पाक सैन्याच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
रविवारी रात्री पाकिस्तान रेंजर्सने नियंत्रण रेषेवरील पिट्टल, चेनाज, नारायणपूरसह सुमारे १५ भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पाक सैन्याने भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांसोबतच सीमा रेषेवरील गावांवरही गोळीबार केला. ईद असल्याने सुरुवातीला भारतीय सैन्याने सावध भूमिका घेतली. मात्र पाकने गोळीबार सुरुच ठेवल्याने अखेरीस भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले. पाक सैन्याने निवासी भागालाही लक्ष्य केल्याने यात ५ भारतीय नागरिक ठार झाले तर ३० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळपर्यंत पाक सैन्याकडून गोळीबार सुरुच होता. १ ऑक्टोबरपासून पाकने तब्बल ११ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
एकीकडे सीमा रेषेवर गोळीबार सुरु असतानाच सीमा रेषेवरील तंगधार सेक्टर येथे घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्याने उधळून लावला. तंगधार सेक्टरमधून भारतात घुसखोरी करणा-या तीन दहशतवाद्यांना भारतीय सैन्याच्या जवानांनी कंठस्नान घातले. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.