मुंबई : देशाच्या नागरी भागात विकसित करण्यात येणाऱ्या सुमारे ४५ विमानतळांची बांधणी न करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले असून लवकरच या संदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल.मेट्रो आणि प्रथम श्रेणी शहरांप्रमाणेच देशाच्या द्वितीय श्रेणी शहरांतूनही विमान सेवा सुरू करण्यासाठी २०१३ मध्ये तत्कालिन संपुआ सरकारने ५० शहरांतून विमान सेवा सुरू करण्याची महत्वाची घोषणा केली होती. ५ विमानतळांचे प्रत्यक्ष काम ही सुरू झाले आहे. या विमानतळांना वगळून उर्वरित विमानतळांचे प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. यात कर्नाटक, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, ओडिशा या राज्यांतील प्रकल्पांचा समावेश आहे. रद्द होऊ घातलेल्या ४५ विमानतळांची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नव्या सरकारने विमानतळ कुठे असावे या निकषात बदल केले असून ज्या शहराची लोकसंख्या १० लाखांच्या वर आहे, अशाच ठिकाणी आर्थिक वैधता तपासून विमानतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. संपुआ सरकारने ज्या शहरांची निवड केली होती त्यात १० लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याने आणि ती आर्थिकदृष्ट्या वैध नसल्याचे मोदी सरकारला जाणवल्याने येथील विमानतळ रद्द होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
४५ विमानतळे रद्द करण्याचे केंद्राचे संकेत
By admin | Updated: April 21, 2015 00:59 IST