4 लाख 80 हजार लोकांची अन्न सुरक्षेसाठी नोंदणी
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
पणजी : राज्यातील एकूण रेशनकार्डधारकांपैकी 1 लाख 20 हजार रेशनकार्डधारकांची नोंदणी सरकारने अन्न सुरक्षा योजनेसाठी केली आहे. म्हणजेच एकूण 4 लाख 80 हजार लोकांना अन्न सुरक्षेचा लाभ मिळणार आहे.
4 लाख 80 हजार लोकांची अन्न सुरक्षेसाठी नोंदणी
पणजी : राज्यातील एकूण रेशनकार्डधारकांपैकी 1 लाख 20 हजार रेशनकार्डधारकांची नोंदणी सरकारने अन्न सुरक्षा योजनेसाठी केली आहे. म्हणजेच एकूण 4 लाख 80 हजार लोकांना अन्न सुरक्षेचा लाभ मिळणार आहे.अन्न सुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीविषयीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या सचिवांनी दिल्लीत बैठक घेतली. नागरी पुरवठा खात्याचे विकास गावणेकर यांनी या बैठकीत भाग घेतला. गावणेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी लाभार्थींना नवी रेशनकार्डे देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या महिन्यात आम्हाला अंमलबजावणी सुरू करायची आहे; पण त्यासाठी अगोदर केंद्राने कोटा देणे गरजेचे आहे. अन्यथा नोव्हेंबरमध्ये अंमलबजावणी निश्चितच सुरू होईल. अगोदर सर्व रेशनकार्डांचे वितरण करा व मग कोटा मागा, अशी केंद्राची भूमिका आहे. अन्न सुरक्षा योजनेसाठी लोक अजूनही अर्ज करू शकतात. उद्या, बुधवारी नागरी पुरवठा खात्याच्या सर्व निरीक्षकांची बैठक बोलविण्यात आली आहे. त्या वेळीही काही निर्णय होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, पाच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून बाहेर काढले जाणार आहे. त्यांची रेशनकार्डे रद्दबातल ठरणार आहेत. जे लोक दारिद्र्य़रेषेवरील आहेत, अशा लोकांनी आपले उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, असे नागरी पुरवठा खात्याला कळविणे सुरू केले आहे. अशा प्रकारचे एकूण 80 हजार अर्ज खात्याकडे आले आहेत.(खास प्रतिनिधी)