ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ३ - दस-या निमित्त गांधी मैदान येथे रावण वधाचा कार्यक्रम बघण्यासाठी अनेक नागरिक उपस्थित होते. विजेची तार तुटल्याची अफवा पसरल्यामुळे लोकांमध्ये गदारोळ झाला, पळण्यासाठी वाट शोधत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३२ जणांना आपला प्राण गमवावा लागला असून ५० जण जखमी झाले आहेत. जखमींवर पाटणा वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये व जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. पोलीस आणि एनडिआरएफच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्यास सुरवात केली आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्यासोबत फोनवरून घटनेबद्दल माहिती घेतली. बिहार सरकारकडून केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेचा अहवाल मागितला आहे. ही घटना कळताच माजी मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी शोक व्यक्त केला असून लालु प्रसाद यादव यांनी दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.