२८... गुमथळा
By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST
गुमथळा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
२८... गुमथळा
गुमथळा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळनागरिकांत भीती : बकऱ्या चोरीचे प्रमाण वाढले गुमथळा : कामठी तालुुक्यातील गुमथळा परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: गावातील बकऱ्या चोरून नेल्या जात असल्याने नागरिकांत भीतीचे वातारवण निर्माण झाले आहे. परिसरातील सोनेगाव येथे दोन दिवसांपूर्वी पाच घरून चोरट्यांनी बकऱ्या लंपास केल्या. दरम्यान, एका ठिकाणाहून चोरट्यांनी महिलेच्या हातून बकरी हिसकावून नेली. लिहिगाव, सावळी येथेही बकऱ्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिसरातील गरीब नागरिक बकरीपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. या परिसरातील काही गावे मौदा आणि काही गावे कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. सदर दोन्ही शहरे दूर असल्याने तसेच फिर्यादीकडे कुठलेही वाहन नसल्याने चोरीच्या घटनांची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्याची तसदी येथील ग्रामस्थ घेत नाही. चोरट्यांनी भरदिवसा चारायला नेलेल्या बकऱ्या लंपास केल्याची माहिती काही गुराख्यांनी दिली. चोरांची टोळी चारचाकी वाहनातून गावात येतात. प्रसंगी चाकूचा धाक दाखवितात आणि बकऱ्या वाहनात टाकून चोरून नेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. नागपूर-भंडारा महामार्गावरील सावळी येथे काही स्थानिक तरुणांनी पानटपरी सुरू केली. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री या ठिकाणी असलेल्या रूपेश हिवरकर व मुरलीधर वरठी यांच्या दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. यात चोरट्यांनी अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती मुरलीधरने दिली. येथून जवळच असलेल्या गोदामातून चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी लोखंड चोरून नेले. या प्रकरणी रमेश टिचकुले यांनी फोनवर मौदा पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप टिचुकले यांनी केला. मौदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवूनही पोलीस किरकोळ गुन्ह्यांच्या तपासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात गस्त सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य कुंदा आमधरे यांच्यासह गुमथळा, सोनेगाव, सावळी व परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)***