हरिश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपतीपदी २५ जुलै रोजी नवीन व्यक्ती विराजमान झालेली असेल, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वत:च स्पष्ट केल्यामुळे त्यांच्या दुसऱ्या टर्मबाबतच्या चर्चा व तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रपतींचे प्रेस सेक्रेटरी वेणू राजामणी यांची नेदरलँडचे दूत म्हणून नियुक्ती झाली असून, ते पुढील महिन्याच्या सुरुवातीला पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. वेणू राजामणी हे परराष्ट्र सेवेतील असून, राजनैतिक अधिकारी म्हणून त्यांनी याआधी काम केले आहे. त्यांना निरोप देण्यासाठी गुरुवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पत्रकारांशी बोलताना प्रणव मुखर्जी म्हणाले की, मला आता आजपासून फक्त दोन महिने शिल्लक आहेत. नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी विराजमान झालेले असतील. मुदत संपल्यानंतर मी १0 राजाजी मार्ग येथील बंगल्यात राहायला जाणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रणव मुखर्जी यांना दुसरी टर्म मिळावी, असे मत व्यक्त केले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्याला दुजोरा दिला होता. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनीही प्रणव मुखर्जी यांना पुन्हा राष्ट्रपती करण्याबाबत अनुकूल मत व्यक्त केले होते. अर्थात ते आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.मात्र भाजपा संघ परिवारातील नेत्यालाच राष्ट्रपती करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त लोकमतने दोन आठवड्यांपूर्वीच प्रकाशित केले होते. राष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार भाजपा जूनच्या तिसऱ्या आठवड्यात निश्चित करेल, अशी शक्यता आहे.
२५ जुलै रोजी नवी व्यक्ती राष्ट्रपती झालेली असेल
By admin | Updated: May 26, 2017 04:03 IST