नवी दिल्ली : काळापैसा पांढरा करण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करून त्याद्वारे पैशाची फेराफेरी करणारे एजंट आणि बनावट कंपन्या यांचा पर्दाफाश करण्यात केंद्रीय वित्तीय गुप्तचर यंत्रणेला यश आले आहे. या ताज्या प्रकरणात तब्बल २५० कोटी रुपयांचा ब्लॅक मनी ‘व्हाइट’ केल्याचे उघड झाले आहे. प्रामुख्याने काळापैसा खिशात असलेल्या लोकांनीच आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे़ त्या अनुषंगाने आता या लोकांच्या दिशेनेच कारवाईची चक्रे फिरण्यास सुरुवात झाली आहे.कोलकाता आणि दिल्ली येथे मोठ्या प्रमाणावर काही एजंटांनी बनावट चलने बनवून त्याचे व्यवहार केल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या दृष्टीने तपास केला असता २५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले. तपास यंत्रणेतील अधिकाऱ्याने या व्यवहारांची कार्यपद्धती विशद करताना सांगितले, की ज्या व्यक्तीकडे काळापैसा आहे, त्याने अशा बनावट कंपन्या आणि त्यांचे चलन बनविणाऱ्या एजंटशी संपर्क साधला. त्याला रोखीने पैसे देऊन खरेदी केल्याचे चलन विकत घेतले. तपास यंत्रणेला मिळालेल्या माहितीमुळे काळापैसा पांढरा होण्याचा प्रकार तर उघड झालाच, पण या सर्व व्यवहारात व्हॅट आणि सेवाकर किती बुडाला याचाही तपास आता सुरू झाला आहे. तर दुसरीकडे एजंटांनी धनादेशाद्वारे पैसे परत केल्याने प्राप्तिकर विभागाने आता याचाही तपास सुरू केला आहे.
२५० कोटींच्या काळ््या पैशाचा झाला पर्दाफाश
By admin | Updated: February 18, 2015 02:51 IST