नवी दिल्ली : अश्लील कार्यक्रम प्रसारित केल्याच्या कारणावरून उल्लू, अल्ट, देसिफ्लिक्स यांच्यासह २५ ओटीटी ॲप व वेबसाइट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्रालयाने केंद्रीय गृहमंत्रालय, महिला व बालविकास मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, कायदा मंत्रालय, तसेच उद्योग क्षेत्रातील फिक्की, सीआयआय यासारख्या संघटना, महिला व बालहक्क क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून हे पाऊल उचलले आहे.माहिती तंत्रज्ञान कायदा २००० आणि माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अंतर्गत संबंधित ॲप्स आणि वेबसाइट्सवर बंदी घालण्यात आली असून, तशा सूचना विविध इंटरनेट सेवा पुरवठादारांनाही दिल्या आहेत. २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रचार सुरू झाला, तेव्हा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक कंटेंट प्रसारित होऊ लागला. जुलै २०२० मध्ये, एका दिवसात प्रौढ कॉमेडी शोचे सर्वाधिक स्ट्रीमिंग (११ दशलक्ष) ऑनलाइन ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर झाले होते.
पाच ॲप गेल्या वर्षीच बंद, पण नव्या डोमेनने प्रसारण सुरूअधिकाऱ्यांनी सांगितले की, २५ ओटीटी ॲपवर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये लैंगिक गोष्टींंबाबतचे सूचक संवाद, दीर्घ अश्लील दृश्ये आणि सामाजिक संदेश, कथानक नसलेले कार्यक्रम दाखविण्यात येत होते. त्यासंदर्भात गेल्या वर्षभरात नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. गेल्या मे महिन्यात हाउस अरेस्ट ही वेबसिरीज उल्लूने बंद केली होती. अश्लील, आक्षेपार्ह आणि पोर्नोग्राफिक कार्यक्रमांचे प्रसारण थांबवावे अशा सूचना केंद्र सरकारने या २५ ॲपना सप्टेंबर २०२४ मध्ये दिल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या सूचनांचे पालन केले नाही. यातील पाच ॲप मार्च २०२४ मध्ये बंद करण्यात आले होते; पण त्यांनी नंतर नवीन डोमेनद्वारे पुन्हा अश्लील कार्यक्रम प्रसारित करायला सुरुवात केली होती.
हेच ते २५ ॲपबंदी घातलेल्या २५ ओटीटी ॲपमध्ये अल्ट, उल्लू, बिग शॉट्स ॲप, देसीफ्लिक्स, बूमेक्स, नवरस लाइट, गुलाब ॲप, कंगन ॲप, बूल ॲप, जलवा ॲप, शोहिट, वॉव एन्टरटेन्मेंट, लूक एन्टरटेन्मेंट, हिटप्राइम, फेनिओ, शोएक्स, सोल टॉकीज, अड्डा टीव्ही, हॉट एक्स व्हीआयपी, हलचल ॲप, मूड एक्स, निऑन एक्स व्हीआयपी, फुगी, मोजफ्लिक्स, ट्रीफ्लिक्स यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.