लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तापमानाची नोंद करण्यास सुरुवात झाली तेव्हापासून आजवरच्या वर्षांत २०२४ हे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. हे पहिलेच असे वर्ष आहे ज्यामध्ये सरासरी जागतिक तापमान १.५ अंशांपेक्षा अधिक राहिले. ही माहिती युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसने शुक्रवारी दिली. २०२४चे जानेवारी ते जून हे महिने सर्वांत उष्ण ठरले तर जुलै ते डिसेंबरपर्यंतच्या कालावधीतील ऑगस्टवगळता प्रत्येक महिन्याचे तापमान २०२३ मधील याच कालावधीपेक्षा कमी होते.
कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, १८५० पासून जागतिक तापमान नोंदी घेण्यास प्रारंभ झाला. तेव्हापासून आजवरचे २०२४ हे सर्वात उष्ण वर्ष ठरले. जागतिक सरासरी तापमान १५.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ते १९९१-२०२०च्या सरासरीपेक्षा ०.७२ अंशांनी आणि २०२३च्या नोंदीपेक्षा ०.१२ अंश सेल्सियसने अधिक होते. २०२४मधील सरासरी जागतिक तापमानाचा विचार करता ते १८५०-१९०० या कालावधीतील सरासरीपेक्षा १.६० अंश सेल्सिअसने अधिक होते. पॅरिस करारात निश्चित केलेली १. ५ अंश सेल्सिअसची मर्यादा गेल्या वर्षी ओलांडली गेली. ही स्थिती यापुढेही कायम राहाण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
ठोस पावले उचलणे आवश्यक
- संपदा क्लायमेट फाउंडेशनचे संस्थापक संचालक व हवामान तज्ज्ञ हरिजितसिंग यांनी सांगितले की, जगात यापुढे तीव्र उष्णतेच्या लाटा, विध्वंसक पूर आणि प्रचंड वादळे यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या संकटांना तोंड देण्यासाठी प्रत्येक देशाने तयारी करणे आवश्यक आहे.
- त्यासाठी मूलभूत सुविधांच्या रचनेमध्येही बदल करणे आवश्यक आहे. जीवाश्म इंधनांचा वापर कमी करून स्वच्छ ऊर्जेच्या वापरावर सर्वांनी अधिक भर द्यायला हवा. त्यासाठी श्रीमंत देशांना अधिक जबाबदारी घेऊन ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.
ग्रीन हाउस गॅसचे प्रमाण वाढले
- २०२४मध्ये वातावरणातील ग्रीनहाउस गॅसचे प्रमाण विक्रमी स्तरापर्यंत वाढले. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण २०२३पेक्षा २.९ पीपीएमने जास्त होते. ते ४२२ पीपीएमपर्यंत पोहोचले, तर मिथेनचे प्रमाण ३ पीपीबीने वाढून १८९७ पीपीबी झाले.
- २०२४साली उष्णतेच्या तीव्र लाटा, विध्वंसक वादळे आणि पुरांमुळे हजारो लोकांनी जीव गमावला. असंख्य घरे उद्ध्वस्त झाली. काही कोटी लोकांना विस्थापित व्हावे लागले.