संतोष ठाकूर।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मारलेली मुसंडी म्हणजे भाजपची त्सुनामी म्हणावी लागेल. २०१९ च्या लोकसभा निवडणूक महासंग्रामाची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक घोषित झाल्यापासूनच सुरु केली होती.
सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पिढीतील काही निवडक नेत्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले. यात राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांचा समावेश होत. त्यांनी सर्वप्रथम धाडसी पाऊल उचलत जुन्या पिढीतील भाजप नेतृत्वाखालील सरकारमध्ये पुढील दहा वर्षे स्थान मिळणार नाही, अशा नेत्यांवर पेट्रोलियम, वाणिज्य, मनुष्यबळ विकास, पर्यावरण, कोळसा, ऊर्जा यासारख्या मंत्रालयाची जबाबदारी सोपविली. हे सर्व नवीन चेहरे भाजपपेक्षा मोदी-शहा यांच्या प्रति समर्पित होते.
पुढल्या वेळी मोदी यांचे सरकार आले नाही, तर आपलेही भवितव्य अंधकारमय होईल, याची जाणीव ठेऊनच हे सर्व पहिल्या दिवसापासून मोदी यांच्यासाठी मैदानात उतरले. त्यांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रत्येक कार्याची किंवा भाषणाची सुरुवात मोदी यांच्याच नावाने केली. तसेच मोदी यांच्याच नामोल्लेखाने सांगता केली. अशा प्रकारचा प्रयोग मोदी यांनी राज्यांतही केला. त्यांनी जुन्या दिग्गज नेत्यांऐवजी नवीन नेत्यांवर राज्यांची धुरा सोपविली.
केंद्रीय स्तरावरही त्यांनी आपल्याच पसंतीच्या नेत्यांना प्राधान्य दिले. त्यामुळे भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय चमकले, तर जुने नेत्यांना दूर सारले.वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांमुळे पक्षाच्या विजयाबाबत साशंकता व्यक्त होऊ शकते. तेव्हा त्यांनी अशा सर्व नेत्यांची निवडणूक लढविण्याची शक्यताच धोरणात्मक निणर्याने संपुष्टात आणली. यामुळे नवीन नेत्यांना संधी देत त्यांना मोदींच्या नावावर मैदानात उतरवून त्यांनी विजयीही केले, असे एका पदाधिकाºयाने सांगितले.