मुंबई - पहलगाम येथील हल्ल्यानंतर किमान १५ हजार लोकांनी काश्मीर पर्यटनाचा बेत रद्द करीत बुधवारी विमानांचे तिकीट रद्द केले आहे. इंडिगोकडे ७,५०० एअर इंडियाकडे ५,००० तर स्पाइसजेटकडे २,५०० विनंती अर्ज आले आहेत. ज्या पर्यटकांना तिकीट रद्द करायचे आहे त्यांना १००% परतावा तर ज्यांना तिकिटाचे पुनर्नियोजन करायचे आहे त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ते करून देण्याची घोषणा विमान कंपन्यांनी केली आहे. हल्ल्यानंतर तिकीट रद्दचे प्रमाण सातपट अधिक वाढले आहे.
श्रीनगरसाठी अतिरिक्त विमान सेवा सुरू कराकाश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी अतिरिक्त विमान सेवा सुरू करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना दिले आहेत. श्रीनगरहून विविध राज्यांत जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर वाढवू नका असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे. हल्ल्यानंतर काही विमान कंपन्यांनी श्रीनगर ते मुंबई, दिल्ली तसेच अन्य ठिकाणच्या विमान तिकिटांच्या दरात दोन ते अडीचपट वाढ केली हाेती.