Ayodhya Ram Mandir Mahashivratri 2025: १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे अयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांती ते महाशिवरात्री या काळात महाकुंभमेळा होत आहे. महाकुंभमेळा सुरू होऊन जवळपास एक महिना झाला आणि या एका महिन्यात तब्बल ६० कोटींहून अधिक भाविक, पर्यटकांनी या अद्भूत आणि दुर्लभ योगाच्या सोहळ्यात सहभाग नोंदवला. महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केल्यानंतर लाखो भाविक, पर्यटक अयोध्येत जाऊन राम मंदिरात रामललाचे दर्शन घेत आहेत. दररोज हा आकडा वाढतच चालला आहे. यातच महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता होत आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अयोध्येत सुमारे १५ लाख भाविक येऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्या दृष्टीने आता प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.
साधारण १४ जानेवारीपासून अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रंचड वाढ सुरू झाली आहे. एका महिन्यात एक कोटींहून अधिक भाविकांनी श्रीरामललाचे दर्शन घेतले आहे. महाशिवरात्रीपर्यंत भाविक मोठ्या प्रमाणात अयोध्येत येण्याचा सिलसिला सुरू राहण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घेऊन गर्दीचे व्यवस्थापन करणारी यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जात आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो, असे सांगितले जात आहे.
महाशिवरात्रीला बहुतेक भाविक जलाभिषेक करण्यासाठी नागेश्वरनाथ मंदिरात पोहोचतील. या परिसरात १४ ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. मंदिराची मर्यादित क्षमता लक्षात घेता भाविकांना गटांमध्ये प्रवेश दिला जाईल. एक गट बाहेर पडल्यानंतरच पुढचा गट प्रवेश करेल.
रामपथावरील सध्याची व्यवस्था २८ फेब्रुवारीपर्यंत लागू राहील. या मार्गावर फक्त पायी जाण्याची परवानगी असेल. गर्दीला लता मंगेशकर चौकापासून राम मंदिरापर्यंत नियंत्रित पद्धतीने पाठवले जाईल. भाविकांची मोठी गर्दी पाहता ड्रोन कॅमेऱ्यांद्वारेही देखरेख केली जाईल. शरयू नदी घाट, राम मंदिर, हनुमानगढी आणि नागेश्वरनाथ मंदिर या भागांवर विशेष लक्ष दिले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.