चौकशीचे आदेश : पंतप्रधान निधीतून मदत
राजमुंदरी (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी सकाळी भारतीय गॅस प्राधिकरण लि. (गेल)च्या पाइपलाइनचा भीषण स्फोट होऊन त्यात 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही स्वतंत्र चौकशी जाहीर केली. ओएनजीसीचा तातिपाका प्लान्ट घटनास्थळापासून जवळच असल्याने स्फोटाच्या घटनेकडे कमालीच्या गांभीर्याने पाहिले जात आहे. आगीत भस्मसात झालेल्या घरांमधून 13 जणांचे खाक झालेल्या अवस्थेतील मृतदेह काढण्यात आले. होरपळलेल्या आणखी दोघांचा नंतर मृत्यू झाला. जखमींना जिल्ह्यातील विविध इस्पितळांमध्ये उचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)