देवळाली कॅम्प : भगूर जुन्या रेल्वे गेटवर रेल्वे रूळ ओलांडत असताना नानेगाव येथील व जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कोषागार कार्यालयातील कर्मचारी चैताली रोकडे ही युवती साकेत एक्स्प्रेसखाली सापडून जागीच ठार झाली आहे. नानेगाव येथील चैताली उत्तम रोकडे (वय २४) ही आज सकाळी सव्वाआठ वाजता नानेगाव येथून भगूर गावात दाखल झाली. तेथून ती रस्त्याने पायी-पायी भगूर बसस्थानकावर येण्यास निघाली. भगूर जुन्या रेल्वे गेट येथून रेल्वे रूळ ओलांडत असताना मुंबईहून भुसावळच्या दिशेने जाणारी साकेत एक्स्प्रेसखाली सापडून चैताली रोकडे जागीच ठार झाली आहे. तिच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (वार्ताहर)
युवती साकेत एक्स्प्रेसखाली सापडून जागीच ठार
By admin | Updated: November 16, 2014 01:23 IST