येवला : तीस लाखांच्या खंडणीसाठी येवला-शिर्डी रस्त्यारून रविवारी (दि. १७) अपहरण झालेल्या येवल्यातील दोन युवकांची नाशिक पोलिसांनी ६० तासांच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप सुटका करून दोन मुख्य सूत्रधारांसह १३ अपहरणकर्त्यांना गजाआड केले. यात दोन युवतींसह एका महिलेचा समावेश आहे. युवक सुखरूप घरी परत आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या १३ आरोपींना येवला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. येवल्याचे माजी नगराध्यक्ष हुसेन शेख यांचा पुतण्या शाहबाज शेख (२२) यास रविवारी एका अज्ञात मुलीचा फोन आला. ‘मी शिर्डी येथे असून, मला भेटायला या’ असे तिने फोनवरून त्याला सांगितले. त्यानंतर शाहबाज आणि त्याचा मित्र राहुल चव्हाण (२३) यांनी बाहेर जाऊन येतो, असे घरी सांगून आय२० (क्र.एमएच १५ सीडी ९६६५) या कारने शिर्डीला गेले. शिर्डीला पोहोचल्यानंतर त्यांनी त्या मुलीच्या मोबाइलवर फोन केला असता ‘मी शिर्डी रेल्वे स्टेशनवर आहे असे सांगितले.’ शाहबाज व राहुल शिर्डी रेल्वे स्टेशनकडे जाण्यास निघाले. यावेळी अपहरणकर्त्यांच्या मुख्य सूत्रधाराने रचलेल्या कटानुसार त्यांच्या कारचा पाठलाग सुरू केला. एका मारुती स्विफ्ट कारने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले, तर दुसरी टाटा मांझा कार चालू लागली तर बाजूला मोटारसायकल चालू लागली. या तीनही गाड्यांनी या युवकांना पेचात पकडले. एका ठिकाणी अपहरणकत्यांपैकी दोघांनी खाली उतरून शाहबाज व राहुलच्या गळ्याला पिस्तूल लावून मागून येणाऱ्या टाटा मांझा या कारमध्ये बळजबरीने बसविले. त्यानंतर ही गाडी नगरच्या दिशेने निघाली. कोणतीही हालचाल अपहृत युवकांच्या नजरेस पडू नये म्हणून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून आतून चुना लावलेला गॉगल घालण्यास सांगण्यात आले. नगरला शिर्डी बायपास रोडवरील एका बंगल्यात या दोघांना डांबून ठेवण्यात आले. त्यानंर अपहरणकर्त्यांच्या सांगण्यानुसार शाहबाजने रात्री ८.४५ च्या सुमारास भ्रमणध्वनीवरून भावाशी बोलताना आपले अपहरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर रविवारी मध्यरात्री या युवकांच्या भ्रमणध्वनीवरून अपहरणकर्त्यांनी पुणे परिसरातून तीस लाख रु पयांच्या खंडणीची मागणी केली. पुणे येथे पैसे वेळेत न पोहचल्यास व पोलिसांना कळविल्यास दोघांनाही जिवंत न ठेवण्याची धमकीही अपहरणकर्त्यांनी फोनवरुन दिली. यामुळे दोघांचेही कुटुंबीय भयभीत झाले. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी,दि. १८ जानेवारी रोजी सकाळ ६ वाजता येवला शहर पोलीस ठाण्यात माजी नगराध्यक्ष हुसेनभाई शेख यांनी फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संजय मोहिते, मालेगांवचे अपर पोलीस अधिक्षक सुनील कडासने, मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी येवल्यात धाव घेतली. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांची तीन पथके तयार केली. त्यांना पुणे, कल्याण व ठाणे येथे रवाना करण्यांत आले. पोलीस निरीक्षक खैरनार यांच्या पथका सोबत पुतण्याच्या अपहरणाने धास्तावलेले हुसेन शेख तीस लाख रुपये घेऊन पुणे परिसरात सोवारी सकाळी ११.३० वाजता पोहोचले. दरम्यान, अपहरणकर्त्यांना येवल्यातुनच कुणीतरी पोलीसांच्या हालचालीं बाबत माहिती देत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिसांची दिशाभूल करण्याचा उद्योग सुरू झाल्याने पोलिस पुणे ,ठाणे, कल्याण, मुंबई या परिसरात फिरत राहिले त्यानंतर पोलीसांनी तपासाची दिशा बदलली त्यामुळे अपहरणकर्त्यांचा मुख्य सुत्रधार सलमान आदमाने याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. सोमवारी रात्रभर सलमानच्या हालचालींवर पाळत ठेवली असता तो येवल्यातील गणेश रसाळ याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी आदमानेला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सर्व प्रकाराची कबुली देत अपहरण केलेल्या युवकांना कोठे ठेवले आहे याची माहिती दिली. पोलिसांनी थेट छापा घालत नगर येथील बंगल्यावरु न अपहत युवकांसह आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेली एक देशी बनावटीची पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, एक चॉपर, दोन जांबिया यासह अपहरण करण्यासाठी वापरलेल्या तीन गाड्या व मोबाईल ताब्यात घेतला. सलमान आदमाने आणि शिर्डीचा किरण कडु या दोघांनी खंडणी वसुल करण्याच्या हेतूने कट रचला. या कटात सामील असलेले श्रीरामपुर येथील पुजा पंकज जैन (२५) व नगरच्या मायलेकी रचना सुभेंद्र साळवे (४०), रविना सुभेंद्र साळवे (२१) यांनी भ्रमणध्वनी करून येवल्याच्या युवकांना शिर्डी येथे बोलावले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या कटाचा मुख्य सुत्रधार सलमान शकील आदमाने (२६), रा. श्रीरामपुर, गणेश नारायण रसाळ (३३), रा. येवला यांचेसह किरण सुनिल कडु (२१), रा. शिर्डी, समीर रशिद बेग (२६), रा. राहता, राकेश वाल्मिक महानोर (२२), रा. राहता, नदी अन्सार पठाण (२५), रा. श्रीरामपुर, मंगेश बबनराव पवार (२८), रा श्रीरापुर, गणेश नारायण शिरसाठ (३४), रा. अहमदनगर, स्वप्नील सुभेंद्र साळवी, (२३), रा. अहमदनगर, पुजा पंकज जैन (२५), रा. श्रीरामपुर, रचना सुभेंद्र साळवी (४०), रा. अहमदनगर, रविना सुभेंद्र साळवी (२१), रा. अहमदनगर, असिफ शेख रा. मुंब्रा यांना पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. तपास पथकात पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, किशोर नवले, ताटी कोंडीलवार, मिच्छंद्र रानमाळे, अभिमन्यू आहेर, रवी वानखेडे, अरु ण पगारे, विजय देवरे, दीपक काकडे, प्रकाश इंगळे, पंकज दराडे, निलेश कातकाडे, दीपक केदारे, सचिन भांबरे, रवी शीलावट, पो.कॉ. कांदळकर, अमोल घुगे, आव्हाड, राजेंद्र पाटील, गोसावी, विश्वनाथ काकड, हरीश आव्हाड, प्रवीण काकड, गोलवड, मच्छिंद्र कांबळे, किरण मोरे यांचा तपास पथकात समावेश होता. अपहरणाच्या या घटनेमुळे येवला शहर परिसरात खळबळ उडाली असून याबाबत चर्चेला उधाण आले आहे. (वार्ताहर)येवला येथील युवकांची अपहरणकर्त्यांपासून सुटका केल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपविभागीस पोलीस अधिकारी राहुल खाडे यांचे आभार मानताना युवकांचे नातेवाईक.
अपहरण झालेल्या येवल्यातील युवकांची सुटका
By admin | Updated: January 20, 2016 23:12 IST