रामनवमीनंतर दोन दिवसांनी येणाऱ्या कामदा एकादशीला दरवर्षी नाशिक शहरातून श्रीराम व गरुड रथ यात्रा काढण्याची परंपरा आहे. शुक्रवारी दुपारी रास्ते आखाडा तालिम संघ व रथोत्सव समितीतर्फे राम रथाचे विधिवत पूजन करण्यात येऊन श्रीफळ वाढविण्यात येईल.
नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून राम व गरुड रथाची ओळख आहे.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. दरवर्षी श्रीराम व गरुड रथोत्सवाला शेकडो भाविकांची गर्दी होत असते. गर्दीत कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने यंदाच्या वर्षी रथोत्सव सोहळा रद्द करण्यात आला. २४९ वर्षांची रथोत्सव परंपरा असून इतिहासात सलग दुसऱ्यांदा रथोत्सव सोहळा रद्द झाल्याचे जाणकारांनी सांगितले.
शुक्रवारी दुपारी राम रथाचे मोजके मानकरी तसेच पदाधिकारी समस्त पाथरवट समाज कार्यकर्ते, रथाचे पूजन करतील आणि त्यानंतर श्रीफळ वाढवून रथात असलेल्या मारुतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करणार आहेत, अशी माहिती रथोत्सव समिती अध्यक्ष दत्तात्रेय शेळके, कार्याध्यक्ष राकेश शेळके, ध्वजाचे नितीन शेलार, नंदू मुठे, रावसाहेब कोशिरे यांनी दिली आहे.