इंदिरानगर : गावठाण भाग, संमिश्र सामाजिक समीकरणे आणि नवीन विकसित भाग असे स्वरूप असलेल्या पूर्व प्रभागात भाजपने पाच वर्षांपूर्वी बाजी मारली. त्यामुळे सभापतिपद साहजिकच याच पक्षाकडे होते. मात्र आता, एक सदस्यीय प्रभागरचनेमुळे अनेक समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे आता बहुमत असले तरी या पूर्व प्रभाग भाजपची दमछाक करणार आहे. अर्थात, प्रभागरचनेमुळेच सर्वच प्रभागात भाऊगर्दी वाढणार आहे.
नाशिक शहरातील जुन्या नाशिकमधील गावठाणाचा काही भाग तेथून द्वारका, इंदिरानगर ,गांधीनगर, डीजीपीनगर क्रमांक १, राजीवनगर, भाभानगर, विनयनगर, शिवाजीवाडी, भारतनगर, साईनाथनगर, दीपालीनगर, सुचितानगर तसेच शिवाजीवाडी, भारतनगर, महालक्ष्मी चाळ, संत कबीर नगर अशा काही भागात झोपडपट्टीचासुद्धा समावेश आहे. त्यामुळे या केवळ परिसराचाच विचार केला तर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेनेबरोबरच समाजवादी पार्टीसारखे अन्य काही पक्षही रिंगणात उतरत असल्याने या विभागात सर्वच पक्षांचे कमीअधिक प्रमाणात वर्चस्व असते. मात्र, पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभागात भाजपची लाट असल्याने महापालिकेत भाजपची सत्ता आली. त्याचप्रमाणे पूर्व प्रभाग सभेत १९ पैकी भाजपचे १२, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार, काँग्रेस पक्षाचे दोन आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे बारा सदस्य असल्याने बहुमत प्राप्त झाल्याने पाचही वर्ष भाजपचाच सभापती विराजमान झाला आहे. या प्रभागात भाजपचे सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, ॲड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, प्रथमेश गिते. सुमन भालेराव, अनिल ताजनपुरे, अर्चना थोरात आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून सुफियान जीन, सुषमा पगारे, शोभा साबळे, समीन मेमन, तर काँग्रेसचे राहुल दिवे, आशा तडवी आणि अपक्ष मुशीर सय्यद असे पक्षीय बलाबल आहे. सध्या महापौर असलेले सतीश कुलकर्णी सलग पाच वर्ष निवडून आले आहेत तसेच शिवसेनेकडून चंद्रकांत खोडे २००७ ते २०१७ असे तीन पंचवार्षिक सलग निवडून आले आहेत. या प्रभागात असे अनेक मातब्बर नगरसेवक असले तरी आता मात्र गणित बदलणार आहे. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने साखळी प्रमाणे एकमेकांच्या मदतीने निवडून येण्याचे राजकारण संपणार आहे. त्यामुळे आता पक्षाचे प्रभुत्व, वैयक्तिक जनसंपर्क आणि कामे हीच प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना निवडणूक खुली आहे, असे चित्र आहे.
इ्न्फो..
सध्या प्रभागात हे आहेत नगरसेवक
चौकट : प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादीचे शोभा साबळे, समिना मेमन, सुफियान जीन, अपक्ष मुशीर सय्यद
प्रभाग क्रमांक १५ भाजपचे अर्चना थोरात, सुमन भालेराव, प्रथमेश गिते. प्रभाग क्रमांक १६ राष्ट्रवादी सुषमा पगारे, काँग्रेस आशा तडवी, राहुल दिवे, भाजप अनिल ताजनपुरे. प्रभाग क्रमांक २३ भाजपचे सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा तर प्रभाग क्रमांक ३० मध्ये भाजपचे सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, ॲड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे.