नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांची सुरक्षितता, नैसर्गिक आपत्तीत बचाव व मदत त्याच बरोबर गर्दीवर नियंत्रण करण्याच्यादृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या सुमारे वीस कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यास ‘यशदा’ने मान्यता दिली असून, नुकतेच त्याचे सादरीकरण होऊन येत्या १२ जानेवारीपासून कुंभमेळ्याशी निगडीत असलेल्या खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यशदाचे उप प्राचार्य सुरेश राठोड यांनी दोन दिवसांपूर्वीच नाशिक येथे येऊन कुंभमेळ्यात आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. कोट्यवधीच्या संख्येने एकाच ठिकाणी भाविक जमा होणार असल्याने व गेल्या कुंभमेळ्याचा अनुभव लक्षात घेता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्यात नैसर्गिक आपत्ती म्हणजेच महापूर, वीज कोसळणे, भूकंप यासारख्या दुर्घटना घडल्यास करावयाच्या उपाययोजना व त्यात मदत, बचाव कार्यासाठी लागणारी साधन-सामग्री याचा आढावाही घेण्यात आला. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी भेटी देऊन केलेली रंगीत तालीम व त्या अनुषंगाने निदर्शनास आलेल्या त्रुटींचा विचार करता या आराखड्यात काही बदल राठोड यांनी सुचविले. सिंहस्थ कुंभमेळ्याशी सुमारे २६ विविध शासकीय खात्यांचा संबंध असून, प्रत्येकाची जबाबदारीही निश्चित आहे.
आपत्ती व्यवस्थापनास ‘यशदा’ तयार सिंहस्थ कुंभमेळा : २६ खात्यांना प्रशिक्षण
By admin | Updated: December 31, 2014 01:07 IST