नाशिक : कुंभमेळ्यातील पहिल्याच पर्वणीच्या दिवशी बदललेल्या शाहीमार्गामुळे साधू-महंतांमुळे गोंधळ उडाला. गाडगे महाराज पुलाखालून गेलेली मिरवणूक भाजी पटांगणावरून रामकुंडाकडे न जाता थेट गोदापात्रात स्नानासाठी जाऊ लागली. पोलिसांनी धावपळ केल्यानंतर मिरवणूक मूळ मार्गावर नेण्यात आली.बारा वर्षांनी होत असलेल्या या पहिल्या पर्वणीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये आडगावनाका येथून लक्ष्मण झुला पुलावरून काळाराम मंदिर आणि सरदार चौकातून रामकुंड असा जुना मार्ग होता. त्यात बदल करण्यात आला असून, आडगावनाका येथून ही मिरवणूक गणेशवाडी तेथून गौरी पटांगण तसेच गाडगे महाराज पुलाखालून भाजी बाजार पटांगण तेथून सरदार चौकासमोरून रामकुंड असा नवा मार्ग आहे. सकाळी निर्वाणी आखाड्याची मिरवणूक भाजी पटांगणावर येताच साधू नदीपात्राकडे धावू लागले. याठिकाणी बंदोबस्तास असलेले पोलीस नवखे होते त्यांना परिसरातील नागरिकांनी माहिती दिल्यानंतर धावपळ झाली. दरम्यान, गाडगे महाराज पुलाखालून मिरवणूक जाताना आखाड्यांच्या ध्वजाला वाकवून न्यावे लागणार होते, तसे होऊ नये यासाठी पुलाखाली जमिनीवर खोलगट भाग तयार करण्यात आला, परंतु त्यामुळे एखाद्या खड्ड्याप्रमाणे खोल असलेल्या या जागेवर आखाड्यांची धावपळ झाली. उतारावरून साधू-महंतही पळत असल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)
शाही मिरवणुकीचा चुकला मार्ग
By admin | Updated: August 29, 2015 23:33 IST