येवला : शहरात केवळ महिलांकडून संचलित होणारे सेवाभावी सामाजिक कार्य करणाऱ्या इंटरनॅॅशनल इनरव्हील क्लबच्या वतीने येवला शहरातून व्यसनमुक्ती आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचे प्रबोधन करणारी फेरी काढण्यात आली. या फेरीत एन्झोकेम विद्यालय आणि स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या विद्यार्थिनींसह इनरव्हील क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाल्या होत्या. येवल्यात विश्व इनरव्हील डे वेगवेगळ्या स्पर्धांतून उत्साहात साजरा झाला. महिला, मुली, असक्षम व्यक्ती, अशिक्षित वर्ग या घटकांसाठी क्लबतर्फेवेगवेगळे कार्यक्र म राबविले जातात. टिळक मैदानातून निघालेल्या या फेरीत स्वत:च्या आरोग्यासाठी पर्यावरण वाचवा, व्यसनाधीनता टाळा, महिला साक्षरता या आशयाचे फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. इंटरनॅॅशनल इनरव्हील क्लबच्या येवला शहर अध्यक्ष शैला कलंत्री, सचिव डॉ. संगीता पटेल, खजिनदार पीनल वर्मा, आय.एस.ओ. शीतल उदावंत, सीसी अंकिता सोमाणी, संचालक वसुधा पटेल, पूजा काबरा, भारती पाटील, सुचिता मंडलेचा, वंदना सोनवणे, शुभा पैठणकर यांच्यासह क्लबच्या सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी खास मुलींसाठी पोस्टर बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये विद्या इंटरनॅशनल स्कूल, डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूल, एन्झोकेम हायस्कूल, स्वामी मुक्तानंद विद्यालय, जनता स्कूल, कांचनसुधा अकॅडमी यांनी सहभाग नोंदविला. या पोस्टर बनविण्याच्या स्पर्धेसाठी प्रदूषण नियंत्रण, मुलगी वाचवा, पाणी वाचवा, वृक्ष लागवड हे विषय देण्यात आले होते. या विषयावर मुलींनी पोस्टर बनविली होती. यातून पाच क्रमांक काढण्यात आले व विजेत्यांना फेरी संपल्यानंतर बक्षिसे वितरण करण्यात आले. (वार्ताहर)
येवल्यात विश्व इनरव्हील डे उत्साहात
By admin | Updated: January 12, 2017 00:01 IST