सिन्नर : व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच स्वावलंबी बनू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करून वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलने परिसराच्या विकासाला हातभार लावणारी एक चांगली नववर्ष भेट दिली आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालय व मराठा विद्या प्रसारक समाज संस्था पुरस्कृत जनशिक्षण संस्था (श्रमिक विद्यापीठ) यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शालेय समिती अध्यक्ष सुदेश खुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात उच्च माध्यमिक विभागाचे समिती अध्यक्ष रंगनाथ खुळे व पंचायत समिती सदस्य रामदास घुळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर पालक संघाचे उपाध्यक्ष दिनकर खुळे, नितीन अढांगळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कडवे, झुंबर कोकाटे, सतीश कोकाटे, कारभारी वारुंगसे, लैला शेख आदि मान्यवर उपस्थित होते. सदर केंद्राद्वारे रांगोळी, मेहंदी आदि छंदवर्गांसह शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, ब्यूटिशिअन, परफ्यूम बनविणे, पाककला, मोटारसायकल दुरुस्ती, मोबाइल दुरुस्ती आदि विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षणाची व वयाची कोणतीही अट नसून अल्पखर्चिक व अल्पमुदतीच्या या वर्गाद्वारे दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती केंद्र समन्वयक दत्तात्रेय भोकनळे यांनी दिली. शंभर प्रशिक्षणार्थींनी नोंद केली असून रांगोळी व मेहंदीचे वर्ग सुरु झाले आहेत. लवकरच शिवणकाम व पाककलेसाठी किमान वीस प्रशिक्षणार्थी उपलब्ध होतील तो वर्ग लगेच सुरु राहतील व तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार असून प्रशिक्षणाच्या अंती विद्यापीठाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल, ज्याचा उपयोग स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याकरता होईल, अशी माहिती प्राचार्य शरद रत्नाकर यांनी दिली. गरजू, होतकरुन तरुण-तरुणींसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त असून परिसरासाठी चांगली संधी असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन सुदेश खुळे यांनी केले. गुलाब सय्यद यांनी आभार मानले. मोहिनी क्षीरसागर व राजेंद्र भावसार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
श्रमिक विद्यापीठाचे प्रशिक्षण केंद्र सुरु
By admin | Updated: January 9, 2015 00:40 IST