नाशिकरोड : जागतिक स्पर्धा वाढल्याने आपल्या वस्तू ग्राहकांच्या माथी मारण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. कमीत कमी किमतीत वस्तू देण्यासाठी कामगारांचे शोषण केले जात आहे. अशा परिस्थितीत सर्व कामगारांनी एकजूट ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मजदूर संघाचे अध्यक्ष जे. आर. भोसले यांनी केले. यू. एस. जिमखाना येथे भारत प्रतिभूती-चलार्थ पत्र मुद्रणालय मजदूर संघाच्या वार्षिक सभेत व नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी बोलताना भोसले म्हणाले की, प्रेस कामगारांनी पूर्वीपासून एकजूट ठेवल्याने व एकच संघटना असल्याने कारखान्याची व कामगारांची प्रगती झाली आहे. कामगारांनी आता जे आहे तेच सांभाळण्याची गरज आहे. मुद्रणालयात पूर्वी १० हजार कामगार होते आता कामगारांची संख्या निम्म्यावर आली असून पूर्वीपेक्षा काम मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे कामगार संख्या वाढविण्यासाठी गरज आहे, असे भोसले यांनी सांगितले. देशात अनेक कामगार संघटना असून त्यामध्ये कामगार विखुरले गेले आहे. शासन कामगार कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल करणार आहे. त्यामुळे कामगारांनी आपले हित जपण्यासाठी एकजूट ठेवण्याची गरज आहे. देशात कामगारांची परिस्थिती भयानक असून दिल्ली मनपाचे आठ महिन्यापासून पगार झालेले नाही. जेथे जेथे महामंडळांची निर्मिती झाली आहे तेथे कामगार कमी करण्याचे धोरण राबविले जाते. त्यामुळे कामगारांनी भविष्यातील धोके ओळखुन व आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कामगार एकजूट ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भोसले यांनी केले. तसेच मुद्रणालय कामगारांनी पासपोर्ट छपाईमध्ये आपली मक्तेदारी कायम ठेवावी असे सांगुन कामगारांना आरोग्य विम्याचे सर्व लाभ शेवटपर्यंत मिळतील यासाठी योजना राबवावी, अशी सूचना भोसले यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना केली. वार्षिक सभेत कामगारांनी विचारलेले प्रश्न, समस्या यांना मजदूर संघाचे नूतन सरचिटणीस जगदीश भोसले यांनी उत्तरे देत सविस्तर माहिती दिली. यावेळी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे आदि कामगार नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माधवराव लहांगे, शिवाजी कदम, जयराम कोठुळे, उत्तम रकिबे, सुनील आहिरे, डी. बी. खर्जुल, रमेश खुळे, उल्हास भालेराव, इरफान शेख, एस. एन. अरिंगळे, अरूण गिते, डी. के. गवळी, विनोद गांगुर्डे, प्रकाश घायवटे, एस. जी. घुगे, के. डी. पाळदे, राजेश टाकेकर, सुदाम चौरे,कार्तिक डांगे, राजु जगताप, एस. व्ही. ताजनपुरे, सचिन तेजाळे, ए. जी. देवरूखकर, उल्हास देशमुख, दीपक दिंडे. संदीप व्यवहारे, मनोज सोनवणे व कामगार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शोषणाविरुद्ध कामगारांची एकजूट गरजेची
By admin | Updated: March 26, 2015 00:37 IST