घोटी : सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता व दुर्लक्षामुळे इगतपुरी तालुक्यातील सार्वजनिक उपक्रमाची अनेक कामे प्रलंबित असताना शासनाचा निधी अनावश्यक ठिकाणी वापरून वाया घालविण्यात आला आहे. रस्त्यावर कोणतीही नदी, नाला किंवा पावसाळ्यातही पाण्याचा स्रोत नसणाऱ्या ठिकाणी पूल बांधण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.चाळीस वर्षांपूर्वी शासनाने घोटी -काळुस्ते पक्क्या रस्त्यांची निर्मिती केली होती. यावेळी जागोजागी लहान मोऱ्या, पूल बांधण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र दारणा नदी व कांचनगावदरम्यान समांतर रस्त्यावर उंचवट्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचा जावईशोध लावत या ठिकाणी पूल बांधण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे प्रस्ताव पाठवून निधी प्राप्त केला व पुलाचे काम करण्यात येत आहे. पावसाळ्यात अनेक वर्दळीच्या ठिकाणचे पूल पावसात वाहून गेल्याने त्या पुलांची अद्यापही दुरुस्ती नसल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला असताना तसेच घोटी - काळुस्ते रस्त्यावरील दारणा नदीवरील पूल व घोटी - शेणवड रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असताना या कामाकडे पाठ फिरवून अनावश्यक ठिकाणी पूल बांधून शासनाचा निधी वाया घालविला आहे. (वार्ताहर)
घोटी-काळुस्ते रस्त्यावर अनावश्यक पुलाचे काम
By admin | Updated: January 31, 2017 01:28 IST