नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत विकासाच्या नावावर शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या दहिपूल, नेहरू चौक, मेन रोड, धुमाळ पॉइंट सराफ बाजार या परिसरातील रस्ते गेल्या ४ महिन्यांपासून खोदून ठेवले आहेत. आगामी काळ हा गणपती, नवरात्री, दिवाळी या उत्सवांचा असून, या वेळी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे निदान नवरात्र आणि दिवाळीपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी युवा सेनेच्या वतीने मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये मेन रोड परिसरात अनेक ठिकाणी केलेल्या खोदकामाबरोबरच खडी, पेव्हरब्लॉक, पाइप, वायरिंगचे सामान पडून आहे. रस्त्यांच्या बाजूचे कॉर्नर खोदून ठेवल्यामुळे येथील रहिवासी घरापर्यंत तसेच ग्राहक दुकानापर्यंत जाऊ शकत नाहीत. तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेना युवा सेनेचे जिल्हा चिटणीस गणेश बर्वे यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. रस्ता क्रॉस करण्यासाठी प्लायवूड ठेवलेले आहे. ते तुटल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पायी चालणेसुद्धा अवघड झाले आहे. खोदकामामुळे आजूबाजूच्या छोट्या गल्लीबोळांत गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करून येथील रहिवासी व व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक दातीर, गोविंद कांकरिया, शहर समन्वयक प्रवीण चव्हाण, लुमान मनियार, अक्षय जगताप, अमोल कुंभकर्ण, किरण पाटील उपस्थित होते.
इन्फो
व्यवसाय संकटात
मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम अतिशय संथगतीने चालू आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत जर सणासुदीच्या काळापर्यंतही काम पूर्ण न झाल्यास व्यावसायिकांचा वर्षभराचा मुख्य व्यवसाय संकटात सापडणार असल्याने कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
फोटो
०३ युवा सेना निवेदन